“जागांसाठी आग्रह करणार नाही, राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 02:15 PM2024-07-20T14:15:12+5:302024-07-20T14:15:45+5:30
Sharad Pawar News: मनोज जरांगेना कोणती आश्वासने दिली, हे सरकारने सांगितले का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हीच जागा द्या किंवा तीच जागा द्या, असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त बोलून दाखवला. पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर अतुल बेनके यांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. पत्रकार परिषदेत याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. हे अतुल बेनके कोण आहेत? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने यांना उत्तर द्यावे, इतका महत्त्वाचा माणूस आहे का हा? तुम्ही कोणाबद्दल विचारायला हवे अन् कोणाला महत्व द्यायला हवे, हे ठरवायला हवे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून दिले. याचा अर्थ जनतेचा कल बदलेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगेना कोणती आश्वासने दिली, हे सरकारने सांगितले का? छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची माहिती मागितली होती. आम्हाला अजिबात कोणी संपर्क साधला नाही. त्यांच्यात काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.