राष्ट्रपती बनण्याबाबत शरद पवार म्हणतात...
By admin | Published: January 27, 2017 02:55 AM2017-01-27T02:55:20+5:302017-01-27T06:36:08+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रपतीपद याबाबत सातत्याने चर्चा रंगलेली असते. राष्ट्रपती बनण्याबाबत शरद पवार म्हणाले...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रपतीपद याबाबत सातत्याने चर्चा रंगलेली असते. मात्र, आता राष्ट्रपती बनण्याबाबत स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवारांनी राष्ट्रपती बनण्याच्या चर्चा खोडून काढल्या. 'लोकसभेत 12 खासदार असणा-या व्यक्तीने राष्ट्रपतीपदाबाबत विचार करू नये' असं पवार म्हणाले.
''माझ्या पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतील ताकद 12 आहे, हे मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे 12 खासदारांचं समर्थन असलेल्या व्यक्तीने राष्ट्रपतीपदासारख्या महत्वाच्या पदाचा विचार करू नये'', असं ते म्हणाले.
पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा, पण ताकद नाही
पंतप्रधान बनण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पवार म्हणाले, पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेले हजारो लोकं आहेत, पण त्यासाठी राजकीय ताकद आवश्यक असते, केवळ क्षमता असून काही होत नाही. जोपर्यंत एखाद्याला आपली राजकीय ताकद चमकवण्यात यश येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही.
पद्मविभूषण पुरस्कार शेतक-यांना समर्पित
शरद पवारांनी पद्मविभूषण पुरस्कार शेतक-यांना समर्पित केला, यावेळी ते म्हणाले, सरकारमध्ये असताना किंवा नसताना मी अनेक वर्ष कृषी क्षेत्रात काम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून विविध कृषी संस्था चालवतो. गरिबीविरोधात लढायचं असेल तर शेतकरी समृद्ध असायला हवा तरच गरिबी संपुष्टात येईल.
पद्मविभूषण पुरस्काराने आनंद
विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याबाबत मला भारतासह विदेशातून अनेक डॉक्टरेट पदवी आणि पुरस्कार मिळाले आहेत. पद्मविभूषण पुरस्कारासाठी मला योग्य समजण्यात आलं त्याबाबत मी आनंदी आहे, असं पवार म्हणाले.