‘ते’ विधान युती तुटावी म्हणूृन- शरद पवार
By Admin | Published: January 31, 2017 02:16 AM2017-01-31T02:16:32+5:302017-01-31T02:16:32+5:30
महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे
पणजी : महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गोव्यात केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना-भाजप यांच्यातील २५ वर्षांची युती तुटल्यानंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यातच ‘पाठिंब्याबाबत प्रस्ताव आला तर विचार करू’ असे विधान शरद पवार यांनी केल्याने राजकीय पतंगबाजीला ऊत आला होता. गोव्यात प्रचाराला आलेले पवार यांनी, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर ते भाजपाच्या विरोधात काम करतील, असे विधान केले. त्यावर महाराष्ट्रात समर्थन आणि गोव्यात विरोध, हे तत्वांशी विसंगत नव्हे काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा किंवा शिवसेनेशी युती केलेली नाही. वस्तुत: हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र होऊ नये, यासाठी रणनीतीचा भाग म्हणून भाजपाच्या समर्थनासंबंधी वक्तव्य आपण केले होते. त्यात या पक्षाशी खरोखरच युती करण्याची तयारीही नव्हती आणि इच्छाही नव्हती, अशी सारवासारवही पवार यांनी केली.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आघाडीसाठी प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची शक्ती त्यांना कळेल, असेही पवार म्हणाले. गोव्यात राष्ट्रवादीकडून ४० पैकी १७ मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)