राजकारणात चढउतार असतात, वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; पवारांचं भाजपवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 05:54 PM2022-01-13T17:54:05+5:302022-01-13T17:57:51+5:30

'गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज असा एकही दिवस जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात नाहीत.'

Sharad pawar says No matter how powerful a person is at the top, these tendencies do not stand up to the collective power | राजकारणात चढउतार असतात, वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; पवारांचं भाजपवर शरसंधान

राजकारणात चढउतार असतात, वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी...; पवारांचं भाजपवर शरसंधान

Next

 
मुंबई - भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हिताची यत्किंचितही आस्था नसलेला पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रे गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले. 
 
आज परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, आज लोक हळूहळू या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज असा एकही दिवस जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. 

मला खात्री आहे की, जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या पिढीला, सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल. या कामात विजय गव्हाणे यांची साथ मिळेल. विजय गव्हाणे हळूहळू चुकीच्या विचारांकडे जे लोक गेले आहेत, त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणतील. परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरीत महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता. त्याच्या पुर्वसंध्येला आज प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे, असेही पवार म्हणाले. 

परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा. एक काळ असा होता, १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेस सोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, राज्याच्या विधीमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले. घरोघरी प्रागतिक विचार पोहोचवण्यात हे नेतृत्व यशस्वी झाले होते. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेले परभणीकर आणि परभणीचे सर्व सहकारी यांनी हा प्रागतिक विचार घेऊन पुढे आले, त्यांपैकीच एक आक्रमक नेतृत्व म्हणजे विजय गव्हाणे, असेही शरद पवार म्हणाले. 

गव्हाणे हे दोस्तीला पक्के -
गव्हाणे हे दोस्तीला पक्के आहेत. त्यामुळेच ते त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. गोपीनाथ राजकारणात आमचे विरोधक असले तरी त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही. त्यांचा स्वभाव गव्हाणे यांना भावल्यामुळेच ते चौकटीबाहेर जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज आमचे एक सहकारी बापूसाहेब काळदाते हे हयात नाहीत. एक दिवशी मी त्यांच्यासमोर गव्हाणे यांचा विषय काढला होता. काळदाते मला म्हणाले की, गव्हाणे भाजपमधील लोकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतील. जर तिथले लोक शहाणे होत नसतील, तर हे तिथून बाहेर पडतील. साहजिकच त्यांनी विचारधारा कधीच सोडली नव्हती. त्यामुळेच ते आज आपल्यासोबत आले आहेत. असेही शरद पवार म्हणाले. 

भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा -
आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले. माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी आज पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. 

मला विश्वास आहे, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची रीघ लागेल. विजय गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी पक्षात येतील, असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.

Web Title: Sharad pawar says No matter how powerful a person is at the top, these tendencies do not stand up to the collective power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.