"शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू’’ बाळासाहेबांचं नाव घेत संजय राऊतांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 09:32 PM2022-06-04T21:32:19+5:302022-06-04T21:33:33+5:30
Sanjay Raut & Sharad Pawar: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बाळासाहेबांचा हवाला देत संजय राऊत यांनी शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असं मत मांडलं.
पुणे - शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बाळासाहेबांचा हवाला देत संजय राऊत यांनी शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असं मत मांडलं. आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे.
संजय राऊत यांनी शरद पवार आणि शिवसेनेच्या संबंधांबाबत बोलताना पवारांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेबाची विशिष्ट्य अशी भूमिका होती. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू ही भूमिका बाळासाहेबांनी अनेकदा मांडली होती.
आमची अशी भूमिका आहे की, या देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद, क्षमता ही शरद पवार यांच्यामध्ये आहे. मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नाही आहे तर नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत बोलत आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहे. तर पंतप्रधानपदाबाबत २०२४मध्ये बोलू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी औरंगाबादच्या संभाजीनगर अशा नामकरणाचा चेंडू संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला. ते म्हणाले की, संभाजीनगर असं नामकरण झालेलंच आहे. जसं प्रयागराजचं नामकरण केलं तसं केंद्रानं औरंगाबादचंही नामकरण करावं, तसा प्रस्ताव राज्यातून केंद्राकडे गेलेलाच आहे.