शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, समितीचा सर्वानुमते ठराव, प्रफुल पटेल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:04 PM2023-05-05T12:04:11+5:302023-05-05T12:08:54+5:30
जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथे त्यांच्या मनात दु:ख, वेदना आणि नाराजी आहे या भावना आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असंही प्रफुल पटेल यांनी सांगितले.
मुंबई - गेल्या २ मे रोजी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील अध्यक्ष निवडीसाठी समिती गठीत करण्याची सूचना शरद पवारांनी केली होती. आज या समितीची बैठक बोलावली. या बैठकीत सर्वानुमते एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय आम्ही शरद पवारांकडे पोहचवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी ते कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. कोट्यवधी जनतेच्या निर्णयाचा आदर करून शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती आम्ही करत आहोत असा ठराव समितीच्या बैठकीत मंजूर केला असल्याची माहिती समितीचे निमंत्रक प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल म्हणाले की, लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात अचानक अतिशय महत्त्वाची सूचना केली होती. आजच्या दिवसापासून मी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचदिवशी त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवावी त्यासाठी समिती गठीत केली होती. त्यात माझे नाव पहिले असल्याने आणि पक्षाचा उपाध्यक्ष असल्याने निमंत्रक म्हणून माझ्यावर जबाबदारी होती असं त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात जे काही घोषणा केली त्याने आम्ही सगळे स्तब्ध झालो. शरद पवार असा कार्यक्रमात निर्णय जाहीर करतील असं आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या हॉलमधील दृश्य सर्वांनी पाहिले. प्रत्येकाने आपापली भावना व्यक्त केली. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मान्यवर यांनी शरद पवारांची भेट एकदा नाही वारंवार घेतली. आम्ही त्यादिवसापासून सारखी विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे. तुम्ही पक्षाचे आधार आहात असं आम्ही त्यांना सांगितले असंही प्रफुल पटेल म्हणाले.
दरम्यान, शरद पवार हे राज्यातच नव्हे तर देशातच मोठे अनुभवी नेते आहे. पंजाबमध्ये गेलो असताना शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. देशातील शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही. या देशाचे दिग्गज नेते यांनीही त्यांच्या भावना सुप्रिया सुळे आणि माझ्याकडे व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाजिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना आमच्याकडे पोहचली. शरद पवारांनी सक्रीय पद सोडू नये असं मत प्रत्येकाने व्यक्त केले. कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथे त्यांच्या मनात दु:ख, वेदना आणि नाराजी आहे या भावना आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असंही प्रफुल पटेल यांनी सांगितले.