“१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:45 PM2024-04-24T19:45:57+5:302024-04-24T19:46:05+5:30
Sharad Pawar News: देशाचा विचार करणारे अनेक पंतप्रधान पाहिले, पण मोदी हे पहिले असे आहेत की, जे देशाचा विचार करत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.
Sharad Pawar News: दहा वर्षांत तुम्ही काय केले? देशाची सत्ता तुमच्याकडे होती. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि उत्तरे आमच्याकडेच मागतात. याचा अर्थ एकच आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेला शब्द पाळत नाहीत. अनेक गोष्टी सांगतात की, मी हे करणार ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की 'लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही,' ही स्थिती मोदींनी देशात केली. आम्ही सतत सांगतो की, मोदींच्या राजवटीत सामान्य माणसाचा जो अधिकार आहे, त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. एका प्रचारसभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे देशाच्या राजधानीत काम उत्तम आहे. अनेक सुधारणा त्यांनी केल्या आहेत. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही, म्हणून त्यांनी मोदींवर टीका केली. त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. हीच स्थिती झारखंड येथे आहे. आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. मोदी ठिकठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात. आम्हाला शिव्या देतात. तुम्ही शिव्या द्या, पण १० वर्षात तुम्ही केले काय तर नोटाबंदी? त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात ७०० लोक मृत्यूमुखी पडले. हे आपण चित्र महाराष्ट्रात पाहिले. याचा अर्थ एकच आहे की, महागाई असो की अन्य प्रश्न असो यासंबंधी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, या शब्दांत शरद पवारांनी चांगलाच हल्लाबोल केला.
गेले १० वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हाती आहे
गेले १० वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हाती आहे आणि नेतृत्व मोदी करत आहेत. मोदींनी अनेक आश्वासने दिली होती. मी महागाई कमी करणार, प्रधानमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर ५० दिवसांच्या आत महागाईच्या संकटातून लोकांना बाजूला करणार हे पहिले आश्वासन होते. पेट्रोलची किंमत कमी झाली नाही. गॅस सिलेंडरची किंमत ४१० होती आता ११६० रुपये आहे. कसा विश्वास ठेवायचा या लोकांवर, अशी विचारणा शरद पवारांनी केली.
दरम्यान, इंग्रजांच्या काळात ज्यापद्धतीने धरपकड होत होती, लोकांना संघर्ष करायला लागत होता. ती अवस्था पंतप्रधान मोदी यांनी देशात केली आहे. म्हणून त्यांचे सर्व कामकाज हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. कुठेही भाषण करताना जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका करतात. या देशात अनेक प्रधानमंत्री पाहिले. यापूर्वीच्या सर्व प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला प्रधानमंत्री आहे जो देशाचा विचार करत नाही. लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी ते घेतात, या शब्दांत शरद पवारांनी टीकास्त्र सोडले.