"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 07:22 PM2024-05-01T19:22:18+5:302024-05-01T19:23:10+5:30
शरद पवारांचे भाजपावर टीकास्त्र, पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीवरही मांडले रोखठोक मत
Sharad Pawar slams PM Modi led Government: देशात आज पंतप्रधाननरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उद्ध्वस्त करणार आहेत. ही निवडणूक देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या आत्महत्येचे कारण त्यांच्या कष्टाची त्यांना किंमत मिळत नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही. पण मोदी या सगळ्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. निपाणी येथील सभेत ते बोलत होते.
ही निवडणूक म्हणजे लोकशाहीची परीक्षा!
देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि भारताचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. भारत हा लोकशाहीचा देश आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ घालवला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाहीच्या पद्धतीने चालवायचा हा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वाने केला. आपल्या आजूबाजूचे देश बघितले, पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही असते, तर कधी लष्कराची हुकूमशाही असते. श्रीलंकेमध्ये मध्यंतरी हुकूमशाही होती. बांगलादेशमध्ये लोकशाही आहे, पण एक काळ असा होता की तिथे लष्कराचे राज्य होते. भारत हा एकमेव देश असा आहे की इथे फक्त लोकांचे राज्य आहे. सर्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश चालवायला लोकशाहीची पद्धती याच्याशी कधीही तडजोड केली नाही. ही निवडणूक म्हणजे लोकशाहीची परीक्षा आहे.
महाराष्ट्रातच पाच टप्प्यात निवडणुका कशासाठी?
"गेली ५ -१० वर्षं ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घ्यायच्या दृष्टीने ही निवडणुकीआधीची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल पंतप्रधान महाराष्ट्रात होते, आजही आहेत. चांगली गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावं लागतंय. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत, त्याची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये आहे. कशासाठी? जर कर्नाटकची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते, तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? याचे कारण असे की, मोदींच्या यंत्रणेचा अहवाल आला असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मत मिळवायचं हे सूत्र त्याच्यामागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही," असेही शरद पवार साहेब यानी स्पष्टपणे सागितले आहे.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये निर्णय राबवले जातात, नुसत्या घोषणा होत नाहीत!
"काँग्रेसच्या हातामध्ये अलीकडच्या काळामध्ये दोन राज्य आली. त्यामध्ये कर्नाटकचा उल्लेख करावा लागेल. त्या सरकारने जे काही निर्णय घेतलेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कर्नाटकात जो पदवीधर आहे पण ज्याला नोकरी नाही अशांना ३ हजार रुपये प्रति महिना देण्याचा निकाल झाला. कुटुंबातील महिलेला २ हजार रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला गेला. सर्वांना मोफत बस प्रवासाचे धोरण सुरु झाले, २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ हा निर्णय घेतला. शेजारच्या तेलंगणा राज्यात काँग्रेसचे राज्य आले. तिथे शेतकऱ्यांना दर वर्षी १५ हजार रुपयांची मदत होते. १८ वर्षांवरील महिलांना २५०० रुपये दिले जातात. मोफत बस प्रवास दिला जातो आणि गॅस सिलेंडर ५०० रूपयांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांना ४०० रुपयांचे पेन्शन मिळते. काँग्रेसच्या हातात राज्य गेल्यानंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले जातात. नुसत्या घोषणा केल्या जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला."