"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:41 PM2024-09-04T13:41:45+5:302024-09-04T13:44:02+5:30

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

Sharad Pawar speaks on Nitin Gadkari statement regarding the statue of Chhatrapati Shivaji Maharaj | "...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..."

"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..."

Sharad Pawar On Nitin Gadkari : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्दैवी प्रकरणावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. नौदल दिनाचे औचित्य साधून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा कोसळला. पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तर हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं. या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाबाबत भाष्य केलं. त्याच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. या घटनेवरुन राजकीय नाट्य सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या घटनेबाबत भाष्य केलं. नितीन गडकरींनी दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना स्टेनलेस स्टिलचा वापर कसा योग्य आहे सांगताना मालवणमधील घटनेचा उल्लेख केला.  समुद्रकिनाऱ्यापासून ३ किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम करताना स्टेनलेस स्टिलचा अधिक वापर केला पाहिजे असं नितीन गडकरी म्हणाले.

आपण मागील काही वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरीस रस्ते आणि त्यावरचे उड्डाणपूल बांधताना स्टेनलेस स्टिलच्या वापरलावर भर देत आहोत. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता, असं नितीन गडकरींनी म्हटलं.

गडकरींच्या या विधानावर कोल्हापुरात बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी आणि त्यांच्या मंत्रालयाने केलेल्या कामाचे कौतुक केले. नितीन गडकरी यांनी कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण झोकून देऊन ते अधिक चांगले काम करतात, असंही शरद पवार म्हणाले.

"नितीन गडकरी केंद्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादं काम हाती घेतलं तर ते मन लावून ते काम करतात. त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात. कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी ते घेतात. देशातील अनेक रस्ते त्यांनी उत्तम पद्धतीने बांधलेत. आम्ही हे संसदेमध्येही मोकळेपणे सांगितलं आहे. गडकरींनी पुतळ्याच्या कामाबद्दल काही मत व्यक्त केलं असेल तर त्यांनी नक्कीच त्याचा अभ्यास केला असेल," असं शरद पवार यांनी म्हटलं.
 

Web Title: Sharad Pawar speaks on Nitin Gadkari statement regarding the statue of Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.