शरद पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला, शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 06:00 PM2024-07-29T18:00:40+5:302024-07-29T18:07:49+5:30
एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीनं जातीजातीत भांडणं लावून आपलं राजकारण केलं आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी काल त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून बोलायचं, हाकेच्या आंदोलनाला फुस लावायची, असं म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला. दोन समाजातील निर्माण झालेल्या तेढवर शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं आहे. जातीय दंगली पेटणार आहेत, असं भाकीत करणं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीनं जातीजातीत भांडणं लावून आपलं राजकारण केलं आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर कधीच भूमिका जाहीर केली नाही. गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारनं त्याची कधी दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज व्यथित झाला होता. ४० वर्षानंतर शिंदे सरकार आल्यानंतर त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली, याचा परिणाम म्हणून जुन्या कुणबी नोंदी सापडल्या. सरकार काही करत नाही, हे त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे. त्यांना कावीळ झाला आहे, असाही घणाघात संजय शिरसाट यांनी केला.
याचबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना बोलवून मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार यांनी आरक्षणाबाबत गोलमोल भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी काल त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून बोलायचं, हाकेच्या आंदोलनाला फुस लावायची, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला.
काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने नवी मुंबईमधील वाशी येथे काल सामाजिक ऐक्य परिषद भरवली होती. या परिषदेला शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं असं वाटलं नाही. ते तिकडे गेले नाहीत. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे.