“...तर न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार”; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:23 AM2024-08-22T08:23:35+5:302024-08-22T08:24:44+5:30
Sharad Pawar MPSC Student News: हे प्रकरण सत्ताधारी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनात उतरणार, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
Sharad Pawar MPSC Student News: एमपीएससी परीक्षेवरून पुन्हा एकदा विद्यार्थांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडणीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची कोंडी झाल्याने अखेर पुण्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे.
आयबीपीएस परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यासाठी शासन, प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात काही सूचना केल्या होत्या, असे समजते. तसेच आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार केलेला दिसत नाही. कारण एमपीएससी परीक्षा नियोजनाप्रमाणे होतील, असे स्पष्ट केले. परीक्षांच्या वेळापत्रकात बदल न झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत स्वतः आंदोलनाला उतरणार असल्याचे म्हटले आहे.
न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, अशी पोस्ट शरद पवार यांनी एक्सवर केली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता शरद पवारांनी स्वतः दखल घेत सरकारला लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत इशारा दिला आहे.
दरम्यान, आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. या प्रकरणी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.