Sharad Pawar Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंची उगीच अशी बदनामी करणं योग्य नाही"; शरद पवारांचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:50 PM2022-07-10T18:50:20+5:302022-07-10T18:51:05+5:30
शरद पवार नक्की कशाबद्दल बोलले, वाचा सविस्तर
Sharad Pawar Eknath Shinde: अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या साऱ्या गोंधळानंतर अचानक एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. भेटीचे वृत्त आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून त्याचे खंडन करण्यात आले. अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही मत व्यक्त केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्यात अशी कोणतीही भेट झाली नाही. जो फोटो मधल्या काळात व्हायरल झाला होता तो फोटो दोन वर्षांपूर्वीचा होता. त्या फोटोचा आणि सध्याच्या राजकारणाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या प्रकारच्या बातम्या पसरवणं हे चुकीचं आहे. उगीच एकनाथ शिंदेंची अशी बदनामी करणं योग्य नाही, असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले अशी चर्चा होती. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला, असेही वृत्त आले होते. तसेच या भेटीचे काही फोटोही व्हायरल झाल्याचे सांगितले जात होते. पण नंतर या साऱ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे २०१९ ते २०२२ या कालावधीत जेव्हा महाविकास आघाडीकडून मंत्री होते, त्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तो फोटो कोणीतरी व्हायरल केला होता असे अखेर उघडकीस आले.
शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर सुमारे आठवड्याभरानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले. नामांतराच्या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा त्यांनी केला. नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.