अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO)
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:22 PM2024-06-06T13:22:06+5:302024-06-06T13:23:11+5:30
Sharad Pawar Supriya Sule, Baramati Lok Sabha Election Result 2024: पवार विरूद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा झाला विजय, सुनेत्रा अजित पवारांचा दीड लाखांनी केला पराभव
Sharad Pawar Supriya Sule, Baramati Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्राच्या मातीतील काका-पुतण्या जोडीत रंगलेला सामना काकांच्या पारड्यात पडला. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये रंगलेल्या द्वंद्वामध्ये बारामतीतशरद पवारांचा विजय झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मतांनी दादा गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पराभूत केले. बारामती लोकसभा निवडणूक ही दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यात शरद पवार हे अजित पवारांवर वरचढ चढल्याचे दिसून आले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राज्यासह देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तशातच सातासमुद्रापार अमेरिकेतही त्यांच्या विजयाच्या शुभेच्छांचा बॅनर झळकला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुळे यांच्या विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर त्यांचे अभिनंदन करणारा मोठा बॅनर लावण्यात आला. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलवर रिपोस्ट करण्यात आला आहे. त्याला मराठी कॅप्शन दिले आहे. "साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले सुप्रियाताई सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर, ताईंचे चाहते @ptalokar9 (परिक्षित तळोकर) यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत," असे कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले आहे.
साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले सुप्रियाताई सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर, ताईंचे चाहते @ptalokar9 यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत... @supriya_sulepic.twitter.com/5jnUaLsIR5
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) June 6, 2024
सुळे यांनी बारामतीकरांचे आभार मानले
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानले. "मी बारामतीच्या जनतेची आभारी आहे. विजयानंतर आपल्या सामूहिक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. गेलेले विसरून जा. निवडणुकीदरम्यान जे काही घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही आणि आगामी राज्याच्या निवडणुकीत ते टाळले पाहिजे. त्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगूया,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.