"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 09:23 AM2024-07-27T09:23:29+5:302024-07-27T09:31:13+5:30
Sharad Pawar : आरोप-प्रत्यारोपांदरम्यान शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
Sharad Pawar Remark on Amit Shah : पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता शरद पवार यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे.
पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते. अमित शाहांच्या त्या टीकेला शरद पवार यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मागे एका भाषणात म्हणाले होते, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. पण, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्ये करत आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं - सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
दरम्यान, २०१० मध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहा यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.