“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:50 PM2024-06-29T16:50:29+5:302024-06-29T16:51:11+5:30
Sharad Pawar News: जनता मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारत महायुतीला चितपट केले. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत हीच लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर लोकसभेचा वचपा विधानसभेला काढण्यासाठी महायुती उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. यातच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना एक आग्रहाची विनंती केली आहे.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा आम्हाला मिळाल्या. सांगलीत विशाल पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला. ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते. यातून धसका घेतला आहे. यातच लोकसभेत २८८ पैकी १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने एक इशारा दिला आहे. यात आमचे बहुमतच आहे. अशी स्थिती विधानसभेत झाली, तर इथे सत्ता बदलणारच आहे. त्यासाठी अनुकूल अशी स्थिती आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...
लोकसभेची हीच स्थिती विधानसभेलाही कायम राहायला काही हरकत नाही. लोक मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही. प्रचाराचा पूर्ण भार हा मोदींवर होता. मोदींनी १८ सभा महाराष्ट्रात घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. माझी आग्रहाची विनंती आहे की विधानसभा निवडणुकीत मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे, सामुहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे.