शरद पवार प्रचारासाठी ठाण्यात
By admin | Published: May 29, 2016 12:35 AM2016-05-29T00:35:54+5:302016-05-29T00:35:54+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता आणखी जोर धरू लागला असून यामध्ये आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता आणखी जोर धरू लागला असून यामध्ये आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या या एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रथमच आरपार अर्थात कांटे की टक्कर होणार आहे. ही जागा जिंकून सलग पाचव्यांदा आमदार होण्याचा मान डावखरे यांना भूषवायचा आहे. मात्र, यंदा त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरवल्याने एक रंगतदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याची स्थिती पाहता शिवसेनेकडे जरी मतांची आघाडी असली तरीदेखील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा जिल्ह्यातील वावर पाहता आणि इतर पक्षांमधील नेत्यांबरोबर असलेला घरोब्याच्या संबंधामुळे ते या निवडणुकीत आपले डाव खरे करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेनेदेखील ही निवडणूक जिंकण्याचे ठरवल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकूणच आता या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. रविवारी नगरसेवकांसाठी मार्गदर्शन मेळावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेस शरद पवार नगरसेवकांना काय कानमंत्र देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीची ताकद कळणार
- येत्या काही महिन्यांवर आता ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीला आपली ताकद दाखवण्याची संधी असून ती गमावल्यास आगामी निवडणुकीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही करून ही निवडणूक जिंकायचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.