Sharad Pawar: 'शाईफेकीचा प्रकार योग्य नाही, पण...; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना परखड शब्दात सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:44 PM2022-12-12T14:44:50+5:302022-12-12T14:50:34+5:30

Sharad Pawar: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

Sharad Pawar: The type of backbiting is not right, but... Sharad Pawar told Chandrakant Patil | Sharad Pawar: 'शाईफेकीचा प्रकार योग्य नाही, पण...; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना परखड शब्दात सुनावले

Sharad Pawar: 'शाईफेकीचा प्रकार योग्य नाही, पण...; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना परखड शब्दात सुनावले

Next

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. दरम्यान, एका तरुणाने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या प्रकरणी  प्रतिक्रिया देताना शाई फेक करणे योग्य नसल्याचे म्हटले आहेत. तसेच चंद्रकांत पाटील यांनाही चार शब्द सुनावले आहेत.

वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की,  काही प्रकार झाले. शिक्षण मंत्र्यांवर शाई फेकली. जे काही प्रकार झाले त्याचं समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांच्या जसा आहे. तसेच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आपलाही आहे. मात्र टीका करणे याचा अर्थ कुणाच्या अंगावर शाई फेकणे असा होत नाही. त्याचं समर्थन आपण कधी करणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी नेमकं केलं काय याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं ते केलं नसतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी फुलेंचा उल्लेख केला. आंबेडकरांचा उल्लेख केला. भाऊराव पाटील यांचा उल्लेख केला आणि मग शब्द वापरला भीक. हा शब्द कुणालाही आवडणार नाही. फुलेंचं आणि आंबेडकरांचं संपूर्ण जीवन संपूर्ण देशाला माहिती आहे. कर्मवीरांना आपलं जीवन ज्ञानदानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीच्या गळ्यातील दागिने विकले, पण शिकणाऱ्या मुलांचं दोन वेळचं जीवन थांबू दिलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचं ब्रिद आहे कमवा आणि शिका, भिक मागा असं नाही. या संस्थेचा मी गेल्या ५० वर्षांपासून अध्यक्ष आहे. तिथे आम्ही कधी राजकारण आणत नाही. अशा संस्थापकांबाबत कर्मवीर भाऊरावांबाबत, फुलेंबाबत, आंबेडकरांबाबत बोलत असताना भीक मागणं असा शब्द वापरला नसतं तर बरं झालं असतं, असे शरद पवार म्हणाले.

नंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की मी सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून आपल्याविरोधात हे केलं. मात्र तुम्ही आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होता. प्रदेशाध्यक्ष होता. आताही मंत्री आहात. सामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती सत्तेपर्यंत पोहोचली याचं उदाहरण केवळ तुम्हीच आहात का? अनेकजण पोहोचले. त्यांच्यावर टीकाटिप्पणीही झाली. मात्र त्यांनी असा कांगावा केला नाही. असो. मी यावर अधिक बोलत नाही. याचं समर्थन करत नाही. मी महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वपक्षीय मित्रांना आवाहन करतो की, शाई टाकणं, तत्सम कृत्य करणं, असले प्रकार आपण करणार नाही, अशी भूमिका आपण घेऊन. तसेच सुसंस्कृत महाराष्ट्राचा लौकिक टिकवण्याची खबरदारी घेऊ, असं आवाहन करतो, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.    

Web Title: Sharad Pawar: The type of backbiting is not right, but... Sharad Pawar told Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.