"शरद पवारांनी स्वतःची ताकद आजमावली, हे पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी केलेलं नाटक"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 10:53 PM2023-05-05T22:53:55+5:302023-05-05T22:56:55+5:30
"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला."
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर, पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील असंख्य कार्यकर्ते आडून बसले होते. यानंतर आज शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. पवारांच्या या निर्णयानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. या संपूर्ण प्रकारातून शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली. तसेच पक्षांतर्गत बंडाळी शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी दिला असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिरसाट म्हणाले, "दोन तारखेचा जो अॅपिसोड होता तो व्यवस्थित पाहिला तर, शरद पवारांनी राजीनामी दिला, त्याची कोणतीही रिअॅक्शन सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर नव्हती. त्यावेळ मनात एक शंका नक्कीच होती, ती म्हणजे एढ्या मोठ्या पदाचा राजीनामा शरद पवार देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत. याचा अर्थ काही तरी घडतंय हे नक्की. पण त्याचा दिखावा कुठेही झालेला नाही. मला वाटते, या संपूर्ण राजीनामा नाटकात सर्वात मोठी भूमिका इतर बाकिच्या लोकांनीही निभावली. शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला आहे. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशारा शरद पवारांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे."
शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली -
या संपूर्ण प्रकारातून शरद पवार यांनी आपली ताकद आजमावली. आजही आपण ग्राऊंडलेवलला कुठवर आहोत, याची परीक्षाही घेतली. तसेच पक्षांतर्गत जे काही थोडे बहूत बंडाळीचे चिन्ह दिसत होते, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी या माध्यमातून दिला आहे, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला -
"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला. ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला आणि आता आणखी माझे वय झालेले नाही, मी राजकारणातच राहणार आहे. हे त्यांनी आता अधोरेखितही केले आहे," असेही शिरसाट म्हणाले.