मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:21 PM2024-05-16T18:21:04+5:302024-05-16T19:19:28+5:30
Sharad Pawar vs PM Modi: "ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोलाही पवारांनी लगावला.
Sharad Pawar vs PM Modi: नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही खरं नाही. ज्यावेळी देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मोदींवर टीकेची तोफ डागली. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.
"नरेंद्र मोदी विचारतात, की मी काय केलं? पण १० वर्षांचा त्यांचा स्वतःचा अनुभव घेतला, तर ते ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचे. वेळी असं झालं, की मी इस्त्राईलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला. अमेरिकेने त्यांचा त्यावेळेस VISA नाकारला होता. त्यांनी सांगितलं, मला इस्राईलला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे, मी त्यांना घेऊन गेलो. तिथल्या कृषी गोष्टी त्यांना ४ दिवस दाखवल्या. आज हे सगळं माहीत असताना हल्ली ते जे बोलतात, ते माझ्या मते राजकारण आहे दुसरं काही नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
"बजेटबद्दल नरेंद्र मोदी यांचे मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. बजेट हे कोणत्या जाती धर्माचे नसते, पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडले जाते, ते देशाचे असते. असे असताना ते जे सांगत आहेत, की मुस्लिमांचे वेगळे ते कधीही होत नाही व होऊ शकत नाही," अशी सडकून टीका त्यांनी केली.
"घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी मी जाऊन आलो. माझ्या मते मुंबई महानगरपालिका, त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. पण त्या संकटाची व्याप्ती इतकी होती, की एका दिवसात त्यांना यश येईल असं नाही. जे काम करत आहेत, त्यांच्यावर टीका करण्याची स्थिती नाही. पण मुंबईसारख्या शहरामध्ये 'रोड शो' अरेंज करणं हे शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंडिशन भयंकर होत असते. त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, तो गुजराती परिसर आहे. मला कळत नाही, त्यांना जर करायचं होतं तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला परिसर आहे. पण त्यांचं लक्ष एका वर्गातच होतं. त्याचा लोकांना त्रास झाला व लोकांच्या तक्रारी आल्या," असा टोला त्यांनी लगावला.
"शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज जी विरोधी शक्ती आहे, त्याच्यात एक नंबरची जागा त्यांची आहे. ५ वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली, त्यात त्यांच्या ५८ जागा होत्या. आमचे ५२ होते आणि काँग्रेसचे काहीतरी ४८ किंवा ४५ होते. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत," असे शरद पवारांनी ठणकावून सांगितले.