पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:35 AM2024-05-08T06:35:38+5:302024-05-08T06:36:05+5:30
लाेकसभेचा तिसरा टप्पा; ११ मतदारसंघांत ६१% मतदान; राज्यात सर्वाधिक कोल्हापुरात , देशात आसाम टाॅपर, उत्तर प्रदेश तळात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आल्यानंतर तिसऱ्या टप्पातही असेच चित्र दिसले. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची रात्री १०.४० पर्यंतची आकडेवारी पाहता पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्यांतील ९३ जागांसाठी ६३.५३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राज्यात सर्वात कमी मतदान झाले. २०१९ मध्ये येथे ६१.८२ टक्के मतदान झाले हाेते. यंदा ५४.१८ टक्के मतदानाची नाेंद झाली. बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट लागले.
उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगानेही मतदारांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, अनेक ठिकाणी सकाळी मतदानासाठी गर्दी झाली होती. दुपारी प्रमाण कमी झाले, सायंकाळी पुन्हा अनेक केंद्रांवर रांगा होत्या. अनेक प्रमुख नेत्यांनी सकाळच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी बारामतीत मतदान केले.
अनेक नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
तिसऱ्या टप्प्यात अमित शाह, शिवराजसिंह चौहान, दिग्विजय सिंह, सुप्रिया सुळे, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, सी.आर. पाटील, डिंपल यादव, युसुफ पठाण, शाहू महाराज छत्रपती, उदयनराजे भोसले, बसवराज बोम्मई, मनसुख मांडविया, प्रणिती शिंदे, विजय बघेल आदी नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
केंद्राबाहेर खून
धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तीन तरुणांमध्ये वादानंतर धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून झाल्याची घटना.
ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील बागलवाडी गावातील दादासाहेब चळेकर या मतदाराने केंद्रावरील तिन्ही ईव्हीएम पेटविण्याचा प्रयत्न केला.
आपल्या देशात दानधर्माला बरेच महत्त्व आहे. त्यापैकी मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ही भावना लक्षात घेता देशवासीय मोठ्या प्रमाणात मतदान करतील, हा विश्वास वाटतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले
पश्चिम बंगालच्या चार लोकसभा मतदारसंघातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. त्यापैकी मुर्शिदाबाद व जांगीपूरमध्ये काही ठिकाणी तृणमूल कॉंग्रेस, भाजप व कॉंग्रेस-सीपीआयचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.