"शिंदे सरकार मराठा युवा सेनेतील युवकांची माथी भडकवण्याचे काम करतंय"; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:34 PM2022-11-02T19:34:26+5:302022-11-02T19:34:48+5:30
अंकुश कदमच्या वयापेक्षा जास्त काळ शरद पवारांचे सामाजिक कार्य, राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
Sharad Pawar vs Eknath Shinde: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलताना दिसल्या. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे, विरोधी पक्षातील भाजपा एकनाथ शिंदेच्या साथीने सत्ताधारी झाले. तर शरद पवार यांच्या पुढाकाराने तयार झालेले मविआ सरकार विरोधी बाकावर गेले. त्यानंतर शिंदे गटातील नेतेमंडळी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि इतर नेतेमंडळींवर टीका करताना दिसत आहेत. तशातच मराठा युवा सेनेचे पदाधिकारी असलेला युवक अंकुश कदम याने नुकत्याच एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्या कार्याबद्दल सवाल उपस्थित केले. त्यावर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
मराठा युवा सेनेच्या काही तरुण पदाधिकार्यांची माथी भडकवण्याचे पाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे, असा जळजळीत आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
अंकुश कदम या मराठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुणांसाठी काय केले हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर, त्याच्या व्हिडीओचा अजिबात राग नाही, परंतु अंकुश कदम यांचे जितके वय आहे, त्याच्यापेक्षा जास्त सामाजिक, राजकीय कारकीर्द आणि कार्य शरद पवार यांचे आहे, याची आठवण तपासे यांनी करून दिली. राज्यात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीयाबाबतचे धोरण असो खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन समाजात आदरयुक्त स्थान मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत. काम करतात म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे, एवढी तरी माहिती अंकुश कदमने घ्यावी, असे जाहीर आवाहनही महेश तपासे यांनी केले.