"सरकार जर ऐकत नसेल तर..."; शरद पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 08:08 PM2023-12-12T20:08:01+5:302023-12-12T20:08:47+5:30

संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर नागपुरात झाला गोंधळ

Sharad Pawar warning from Yuva Sangharsh Yatra says If the government won't listen youth will show power of unity | "सरकार जर ऐकत नसेल तर..."; शरद पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून थेट इशारा

"सरकार जर ऐकत नसेल तर..."; शरद पवारांचा युवा संघर्ष यात्रेतून थेट इशारा

Sharad Pawar, NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातून सुरू झालेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे समारोप करण्यात आला. या यात्रेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, जर सरकार ऐकत नसेल तर युवाशक्ती काय करु शकते, हे सरकारला देखील समजेल. त्यासाठीच ही यात्रा आहे. या देशामध्ये काळ्या आईशी ईमान राखणारा हा शेतकरी आहे. त्याची संकटे दूर करण्यासाठी अनेक कार्यक्रम हे संघर्ष यात्रेतून झाले आहे. आरक्षणाचा प्रश्न मराठा, धनगर, लिंगायत आरक्षण यावर चर्चा झाली. त्यामुळे या तरुणांना मी धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, मी देखील यात्रा काढली, जळगाव ते नागपूर पर्यंत काढली. तेव्हा अमरावती जिल्ह्यात पोहरा या ठिकाणी अटक झाली. यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला. तुम्ही एसटीत कधी बसले का? त्यानंतर पोलिसांनी मला थांबवले होते. काही यात्रा इतिहास घडवत असतात. सामुदायिक शक्तीपुढे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं होतं. असेच पुन्हा घडू शकते, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावार पुणे येथून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेने २४ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर असा प्रवास केला. या यात्रेने १० जिल्हे, ३० तालुके आणि सुमारे ८००  किलोमीटरचे अंतर पार केले. आज नागपूरमधील झीरो माइल चौकात या यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विधिमंडळाकडे मोर्चासह जात असताना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर सरकारला निवेदन देण्यासाठी पवार तिकडे जात होते. यावेळी राज्य सरकारकडून कोणीच न येता भाजपाचे शहर अध्यक्ष आल्याने रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते संतापले. यातून गोंधळ उडाल्याने रोहित पवारांसह, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Sharad Pawar warning from Yuva Sangharsh Yatra says If the government won't listen youth will show power of unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.