शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्य दिन साजरा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 06:11 AM2019-08-14T06:11:15+5:302019-08-14T06:11:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करतील.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करतील.
सातारा, सांगली, कोल्हापुरात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. १४, १५ आॅगस्टच्या दौऱ्यासाठी पवार मंगळवारी रात्री कराडला दाखल होतील. बुधवारी सकाळी कराडहून हातकणंगले व शिरोळचा दौरा करतील. १५ आॅगस्टला शिरोळमध्ये ध्वजवंदनानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील. चिखली, आंबेवाडी, वडंगे, कसबा बावडा या गावांना भेटी देतील. नंतर कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करून पुण्याकडे निघतील.
‘त्या’ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा - राष्ट्रवादीची मागणी
मुंबई : राज्यातील सर्व पूरग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकºयांचे जून २०१९ अखेरपर्यंतचे सर्व थकित कर्ज, व्याजासह सरसकट माफ करावे, नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून किमान ४ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत प्राप्त करुन घ्यावी. सर्व पंचनामे व नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करावा अशी मागणीही राष्टÑवादीने केली. पाण्याखाली असणाºया पिकांना, ऊसाला व आंबा, काजूसारख्या सर्व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये, भाताला ५० हजार, नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्या, शेतपिक नुकसानीसाठी शेतकºयांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करा, खरवडलेल्या जमिनींसाठी, शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजारांची मदत जाहीर करा. शेतकरी व शेतमजुरांना ४० हजार रुपये रोख द्या अशा मागण्या त्यांनी केल्या.
पूरग्रस्त भागात ४८ तासांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली असलेल्या मालमत्तांना नुकसानभरपाईची अट शिथिल केल्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा शासन निर्णय तातडीने काढा, वाहून गेलेल्या पशूधनाची नुकसान भरपाई द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुराची पारदर्शक माहिती कधी देणार? - सुप्रिया सुळे
मुंबई : ‘पारदर्शक’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. पूरग्रस्त भागात सध्या काय परिस्थिती आहे, मदतकार्याची स्थिती काय आहे, परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत प्रशासन काय करत होते, आदी प्रश्नांची पारदर्शक उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
मंगळवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सुळे म्हणाल्या की, पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचविणे, औषधांचा साठा देणे, घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे आवश्यक आहे. केवळ घर दिले, बिस्किटचा पुडा दिला म्हणून जबाबदारी संपत नाही. लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी आपली आहे. लातूर भूकंपानंतर शरद पवार सलग १५ दिवस प्रशासनाला सोबत घेत नेतृत्व करीत होते. अशा आपत्तीत ठाण मांडूनच बसावे लागते. लोकांना वेळ द्यावा लागतो. शरद पवार आजही कराडला जात आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते अंग झटकून काम करीत आहेत, असेही सुळे यांनी सांगितले.