शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 08:50 PM2024-08-21T20:50:55+5:302024-08-21T20:51:48+5:30
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी शरद पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sharad Pawar Z+ Security : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची Z+ प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरे सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.
The Central government has accorded 'Z+' category Central Reserve Police Force armed VIP security cover to NCP (SP) chief Sharad Pawar.
— ANI (@ANI) August 21, 2024
(file pic) pic.twitter.com/YVCMLY3sAT
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना Z+ प्लस सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना केंद्राची Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 55 सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल.
Z Plus दर्जाची सुरक्षा काय आहे?
यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये 10 आर्म्ड स्टॅटिक गॉर्ड्स, चोवीस तास 6 PSO, 24 जवानांची दोन पथके आणि 5 वॉचर्स असतात. याशिवाय, एक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक प्रभारी म्हणून नियुक्त केला जातो. याशिवाय, घरी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सहा तपास आणि स्क्रीनिंग कर्मचारी आणि चालकांचा समावेश आहे.