शरद पवार करणार नवी सुरुवात, पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाची चाचपणी सुरू, हे असू शकतं नवं चिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:01 AM2024-02-07T11:01:35+5:302024-02-07T11:03:46+5:30
Sharad Pawar News: अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. या निकालामुळे शरद पवार आणि पक्षातील त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे
गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले होते. दरम्यान, या दोन गटांपैकी अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. या निकालामुळे शरद पवार आणि पक्षातील त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाला आपल्या पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह निवडावं लागणार आहे. जर शरद पवार गटाकडून योग्य वेळेमध्ये पक्षाचं नाव आणि चिन्ह सुचवलं नाही तर त्यांच्या गटातील उमेदवारांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट पक्षावर आपापला दावा सांगत होते. अखेरीस मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल सुनावताना अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगितले. त्याबरोबरच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आमि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नव्या पक्षासाठी नाव आणि चिन्ह सुचवण्यास सांगितले आहे . आता शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाबाबत चाचपणी सुरू झाली आहे. शरद पवार गटाकडून उगवता सूर्य, कपबशी, सूर्यफूल आणि चष्मा या चिन्हांचा विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उगवता सूर्य हे शरद पवार गटासाठी नवं चिन्ह असू शकतं. तर शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांची पक्षासाठी नवं नाव म्हणून चाचपणी सुरू आहे. पक्षाचं चिन्ह आणि नाव सूचवण्यासाठी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिले आहे.
दरम्यान, पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी चाचपणी होत असतानाच शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. निवडणूक आयोगाने आमच्यासोबत न्याय केलेला नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत.