दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:49 AM2019-05-14T08:49:46+5:302019-05-14T08:52:56+5:30
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे.
बीड - संपूर्ण राज्यात यावर्षी १९७२ पेक्षा भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठीच आपण राज्यातील दुष्काळी भागातील पाहणी करीत असून यासाठी उपाययोजना सुचवण्या संदर्भात आपण येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. सोमवारी सकाळपासून बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील आष्टी, पाटोदासह अनेक गावांना त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई, सरकारने केलेली टँकर व्यवस्था याची पवारांनी माहिती जाणून घेतली.
पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. अनेक शेतकर्यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच, अशा भिषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आपण, राज्य आणि केंद्र सरकार समोरही मांडणार आहे. त्यासाठी, येत्या ८ दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी स्वतः भेट घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले