भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 02:04 PM2024-08-12T14:04:49+5:302024-08-12T14:05:48+5:30
भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: भटका समाज हा जातींमध्ये विखुरला असून, या समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी या जनगणनेचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची ग्वाही रविवारी दिली. सोलापुरात भटके विमुक्त ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रविवारी राज्यव्यापी मेळावा झाला. पवार यांनी या मेळाव्यास संबोधित केले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.
विखुरलेला भटका समाज नेमका किती याचा शोध घेतला पाहिजे, यासाठी जातीनिहाय जनगणना व्हावी ही समाजाची मागणी रास्त असून, यासाठी आम्ही संसदेमध्ये पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहोत, असे पवार यावेळी म्हणाले. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. या समाजास ऊर्जितावस्था मिळण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमशाळा जाचक अटींमुळे कमी होत असल्याची चिंताही पवार यांनी व्यक्त केली.
पाच मराठा आंदोलकांना घेतले ताब्यात
सोलापूरच्या मेळाव्याआधी बार्शी येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार यांनी संबोधित केले. भाषण सुरू असताना, अचानक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना काळे झेंडे दाखविले. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. त्यांना ताब्यात घेईपर्यंत मध्यभागी सभेत एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
कुर्डूवाडीत विचारला जाब
टेंभूर्णी-कुर्डूवाडी रस्त्यावरील अंबाड येथे कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी शरद पवार यांचा ताफा थांबविला. स्वागत स्वीकारून परत गाडीत बसताना अचानक मनसेचे तालुकाध्यक्ष सागर लोकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर पाठिंबा आहे, असे पवार म्हणाले.