भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 03:44 PM2018-03-10T15:44:48+5:302018-03-10T15:50:07+5:30

भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल.

sharad pawar writes to cm demands proper medical treatment to chhagan bhujbal | भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.  आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही शरद पवारांनी पत्रातून दिला आहे.

शरद पवार यांनी पत्रात म्हंटलं आहे की,
काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या सतत बिघडत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला फार चिंता वाटते आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालील आहे.
भुजबळांचं प्रकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. "जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे." हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.
छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.
छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. 
मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल.

Web Title: sharad pawar writes to cm demands proper medical treatment to chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.