शरद पवार तुम्हीसुद्धा !
By Admin | Published: June 9, 2014 03:15 AM2014-06-09T03:15:25+5:302014-06-09T16:21:02+5:30
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मतांच्या राजकारणासाठी इतके अगतिक झाले आहेत की, कायदे मोडणाऱ्यांनाच त्यांनी कायदे मंडळात आणून बसवले आहे
अतुल कुलकर्णी, मुंबई
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मतांच्या राजकारणासाठी इतके अगतिक झाले आहेत की, कायदे मोडणाऱ्यांनाच त्यांनी कायदे मंडळात आणून बसवले आहे. नरेंद्र मोदींनी जाती-धर्माचे राजकारण उधळून लावले, दोन्ही काँग्रेसला सपाटून पराभव स्वीकारावा लागला, तरीही स्वार्थी राजकारणासाठी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांचा आधार पवारांना घ्यावा लागला, त्यावरूनच त्यांचा पक्ष किती सैरभैर झाला आहे हे स्पष्ट होते.
राष्ट्रवादीने विधान परिषदेवरील या वेळच्या नियुक्त्यांसाठी निवडलेली नावे पाहिली की रामदास फुटाणे, ना. धों. महानोर अशा मान्यवरांना विधान परिषदेत आणणारे हेच शरद पवार आहेत का, असा प्रश्न पडावा. नियुक्त्यांसाठी सरकारने राज्यपालांकडे ज्या नावांची शिफारस केली, त्यांची पूर्वपीठिका तरी गुप्तचर विभागाकडून तपासून घ्यायला हवी होती. मात्र तसे न करताच या नावांवर शिक्कामोर्तब झाले.
कोणतेही नवीन औषध बाजारात येण्याआधी किंवा कोणताही नवा स्टॉकिस्ट नेमण्याआधी आमची एनओसी घेतली पाहिजे, अशी दहशतवादी भूमिका घेणाऱ्या केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्या विरोधात ओडिशातील एक स्टॉकिस्ट भारतीय स्पर्धा आयोगाकडे गेला. २००८ ते २०११ या कालावधीत या संघटनेने अशा एनओसीपोटी १४.१३ कोटी रुपये गोळा केल्याचे सिद्ध झाले. आयोगाने संघटनेला ४७ लाखांचा दंड ठोठावला; शिवाय यापुढे अशी सक्ती न करण्याचे लेखी आश्वासनही आयोगाने संघटनेकडून घेतले. याच संघटनेने नामसाधर्म्य असलेली दुसरी कंपनी काढून छोट्या छोट्या औषध विक्रेत्यांकडून करोडो रुपये गोळा केले. ते परत मिळावेत म्हणून नाशिकच्या गोरख चौधरी या औषध विक्रेत्यानेच लढा दिला.
औषध परवान्यातील अटींनुसार दुकानात फार्मसिस्ट नेमणे आवश्यक असूनही संघटनेने कायदा आणि लोकहिताविरुद्ध भूमिका घेतली. पयार्याने औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली. यावरून मुंबई ग्राहक पंचायतीने या संघटनेवर रुग्णांना वेठीस धरल्याचा ठपका ठेवला, आणि जाणत्या राजाने या सगळ्या कृत्याचे बक्षीस म्हणून केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्वेसर्वा जगन्नाथ शिंदे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य केले!
या संघटनेच्या वागणुकीला त्यांच्यातलेही अनेक प्रामाणिक विक्रेते कंटाळलेले आहेत़ अशा लोकांनी आता जायचे तरी कोणाकडे, याचे उत्तर पवारांनीच दिले पाहिजे. या नियुक्त्या कायदेशीर, तांत्रिक मुद्द्यांना धरून झाल्या असतीलही, पण राज्यघटनेला अपेक्षित अशा औचित्याला धरून आहेत का, याचेही उत्तर पवारांनी द्यायला हवे. काही जण म्हणतात, या नियुक्तीमागे सुप्रिया सुळे आहेत तर काहींच्या मते नव्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री झालेले जितेंद्र आव्हाड यामागे आहेत. कोण मागे आहे, पुढे आहे याला अर्थ नाही. निवडणुकीच्या पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार यांनी औषध विक्रेत्यांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचे म्हटले होते. मात्र महागाईने जनता त्रस्त होती, राष्ट्रवादी मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराला विटली होती, सगळे निर्णय केवळ कागदावरच ठाण मांडून बसले होते, छोट्या छोट्या कामांसाठी देखील पदरमोड करून मुंबईला खेटा माराव्या लागत होत्या, अशा असंख्य कारणांमुळे पराभव झाला असेल असे मात्र पवारांना त्या वेळी वाटले नव्हते. त्यामुळे दोष शिंदे यांचा नाहीच. असेलच तर तो शरद पवार यांचा आहे. जातीपातीचा आधार घेतल्याचे दिसून येणाऱ्या या नियुक्त्या योग्य की अयोग्य, हे येणाऱ्या निवडणुकीतच जनता ठरवेल.