‘उत्तराधिकारी’ दिल्लीसाठीही महत्त्वाचा! शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी कुणाशीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:46 AM2023-05-04T08:46:29+5:302023-05-04T08:46:56+5:30

राजकीय महानाट्यावर कसा पडदा पडणार याकडे देशाचे लक्ष 

Sharad Pawar's achievements are not equal to anyone | ‘उत्तराधिकारी’ दिल्लीसाठीही महत्त्वाचा! शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी कुणाशीच नाही

‘उत्तराधिकारी’ दिल्लीसाठीही महत्त्वाचा! शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी कुणाशीच नाही

googlenewsNext

सुनील चावके 

मुंबई/नवी दिल्ली  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम राहिल्यास त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल हा प्रश्न केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर राष्ट्रवादीच्या दिल्लीतील राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. 

दिल्लीत गेली चार दशके साखरपेरणी करणारे शरद पवार यांची जागा घेण्याइतकी क्षमता आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणातच नाही. पवार यांची सावली मानले जाणारे प्रफुल्ल पटेल तसेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे उत्तम नेटवर्किंग असले तरी दिल्लीच्या  राजकारणात शरद पवार यांच्या कर्तृत्वाची बरोबरी करण्यासाठी ते पुरेसे नाही.

जबाबदाऱ्यांच्या त्रिभाजनाचा पर्याय
विचारधारा आणि पक्षभेद विसरून सर्व राष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याची क्षमता सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये असली तरी ते विश्वासार्हतेच्या बाबतीत शरद पवार यांच्या तुलनेत कमी पडतात. अशा स्थितीत शरद पवार सध्या एकट्याने सांभाळत असलेल्या राज्याच्या तसेच राष्ट्रीय नेतृत्वाच्या जबाबदारीचे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांमध्ये त्रिभाजन करावे लागेल.

आगामी लोकसभा निवडणूक शेवटची? 
पुढच्या वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक ही शरद पवार यांच्यासाठी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होण्यापूर्वीची कदाचित शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक होईपर्यंत राज्यातील आणि देशातील राजकारणात आपले महत्त्व शाबूत ठेवण्याला शरद पवार यांनी प्राधान्य दिले आहे. २०२४ साली सत्तेची बाजी विरोधकांच्या हाती आल्यास पवार यांना सर्वसंमतीने पंतप्रधान होण्याची अनपेक्षित संधी मिळू शकेल. 

‘अदृश्य’ दबाव झुगारण्यासाठी धडपड
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर, विशेषतः अजित पवार यांच्यावर ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा अदृश्य दबाव असल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसवर दरदिवशी वाढत जाणारा अदृश्य दबाव परतावून लावण्यासाठी शरद पवार यांना कधी केंद्रातील मोदी सरकारची मर्जी सांभाळण्यासाठी तर कधी विरोधकांना खूश करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सतत कोलांटउड्या माराव्या लागल्या असून, अनेकदा परस्परविरोधी विधाने करावी लागली आहेत. 

...तर राष्ट्रवादीचीही अवस्था शिवसेनेसारखीच? 
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांशापेक्षा जास्त आमदार फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची भाजपची रणनीती आहे. तसे झाल्यास खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची असा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात उपस्थित होईल. एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जशी अवस्था झाली, तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: Sharad Pawar's achievements are not equal to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.