शरद पवारांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस
By Admin | Published: November 25, 2015 03:23 AM2015-11-25T03:23:15+5:302015-11-25T03:23:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस, १0 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी ५.३0 वाजता एका सोहळयात संपन्न होईल.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस, १0 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी ५.३0 वाजता एका सोहळयात संपन्न होईल. सोहळयास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे व पवारांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मित्रपरिवाराचे अवघे तारांगणच या सोहळयासाठी विज्ञान भवनात लोटणार आहे.
या सोहळयाच्या आयोजन समितीने मोदी मंत्रिमंडळातील तमाम मंत्री, सर्व खासदार, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, पंजाब, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही खास निमंत्रणे पाठवली आहेत.
पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी कधीही एका व्यासपीठावर एकत्र आलेले नाहीत. पवारांच्या आयुष्यातील या खास सोहळयासाठी हे दोन प्रमुख नेते एका व्यासपीठावर येतील काय? याकडे राजधानीतल्या साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती , उपराष्ट्रपती व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची स्वीकृती कळवली आहे. तथापि पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींनी आपली अधिकृत स्वीकृती आयोजन समितीकडे अद्याप पाठवलेली नाही. तरीही सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पवारांच्या कार्यक्रमासाठी दोघांनीही १0 डिसेंबर रोजी सायंकाळची वेळ राखून ठेवली आहे.
अशाच सोहळ््याचे आयोजन दिल्लीखेरीज मुंबई, पुणे व बंगलुरू अशा आणखी ३ ठिकाणी होणार आहे. दिल्लीतील सोहळयाच्या आयोजनाची सूत्रे खासदार प्रफुल पटेल, डी.पी. त्रिपाठी व सुप्रिया सुळे यांच्याकडे आहेत तर पवारांच्या वाढदिवशी म्हणजे दिनांक १२ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित सोहळ्याचे संयोजन सुनिल तटकरे व हेमंत टकले करीत आहेत. बंगलुरू येथे १८ डिसेंबर रोजी आयोजित पवारांच्या अमृत महोत्सवाची सोहळयाची सूत्रे माजी मंत्री पी.जी.आर. सिंधिया यांच्याकडे आहेत तर पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत २0 डिसेंबरला होणाऱ्या अमृत महोत्सवाच्या महासोहळयाच्या आयोजनाचे संचलन पवारांचे निकटवर्ती मित्र विठ्ठल मणियार करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)