"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:36 PM2024-07-15T23:36:24+5:302024-07-15T23:38:34+5:30

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

"Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | "शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

मुंबई :  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अपॉईंटमेंट नसताना देखील छगन भुजबळशरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या भेटीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची एक सविस्तर पोस्टच छगन भुजबळ यांनी शेअर केली आहे.

शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा? याबाबत छगन भुजबळ यांची पोस्ट जशीच्या तशी....

राज्यातील सामाजिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती करण्यासाठी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा केली.

- गेल्या काही दिवसांत राज्यात जातीवरून एकमेकांबद्दल मनं कलुषित मराठा व ओबीसी एकमेकांशी व्यवहारही करेनासे झाले आहेत
- राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणं ही त्यांची जबाबदारी
- मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून मराठवाडा पेटलेला असताना तो शांत करण्यासाठी सत्तेचा विचार न करता त्यांनी घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाची आठवण करून दिली.
- परंतु सध्याच्या या अशांततेच्या परिस्थितीत मात्र आपला कोणताही पुढाकार दिसत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. यावर त्यांनी मराठा किंवा ओबीसी उपोषणकर्त्यांना सरकारने काय आश्वासने दिली, याची काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गावागावात काय परिस्थिती आहे, याबद्दल त्यांचा अभ्यास अधिक आहे. त्यामुळे आपण पुढाकार घेतला पाहिजे, अशी विनंती त्यांना केली.

यावर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री महोदयांशी बोलून मराठा व ओबीसी उपोषणकर्त्यांना सरकारने दिलेल्या आश्वासनांबाबत माहिती घेण्याचे, तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी कशा पद्धतीने आणि कोणाकोणाशी चर्चा करता येईल, हे ठरवणार असल्याचे आश्वासन मा. शरद पवार साहेबांनी आश्वासन दिले आहे.

सध्या महाराष्ट्रात तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, यासाठीच माझा हा प्रयत्न होता आणि यासाठी कोणालाही भेटण्याची वेळ आली तरी माझी त्यासाठी तयारी आहे. राज्यातील वातावरण शांत असलं पाहिजे, गोरगरिबांची घरे पेटता कामा नयेत, एकमेकांच्या जीवावर कोणी उठू नये हाच माझा यामागील हेतू आहे. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून सर्व मतभेद, पक्ष बाजूला ठेवून यावर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टीला राजकारणाचा कोणताही गंध लागता कामा नये, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे. मला स्वतःला ना राजकारणाची पर्वा आहे, ना पदाची! राज्य शांत राहण्यासाठी मला आणखी कोणालाही भेटण्याची आवश्यकता वाटली तर मी आवर्जून भेटेन. याबाबत कोणालाही विनंती करायला मला कोणताही कमीपणा वाटणार नाही. त्यामुळे शरद पवार साहेब लवकरच राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास आहे.

Web Title: "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.