अर्ध्या तासासाठी ३५ हजार कोटी देणे अयोग्य, शरद पवार यांचे बुलेट ट्रेनवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:16 AM2017-10-04T05:16:07+5:302017-10-04T05:16:32+5:30
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून फक्त ३५ मिनिटे प्रवास करेल आणि गुजरातमध्ये ती अडीच तास चालेल. आपल्याकडे त्याची फक्त दोन तीन स्टेशन आहेत.
मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून फक्त ३५ मिनिटे प्रवास करेल आणि गुजरातमध्ये ती अडीच तास चालेल. आपल्याकडे त्याची फक्त दोन तीन स्टेशन आहेत. त्यासाठी ३५ हजार कोटींचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करणे अव्यवहार्य असल्याचे सांगून राज्याला बुलेट ट्रेन लाभदायक नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यापेक्षा मुंबईतील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी सरकारने खर्च केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
बुलेट ट्रेन प्रकरणी प्रशासन किती बेफिकीरीने वागत आहे. हे लक्षात येते, असा टोलाही पवारांनी मारला. ठाण्यातील इक्बाल कासकर प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाची सूई असल्याचे विचारले असता पवार म्हणाले, जो पोलीस अधिकारी तुरुंगाची हवा खाऊन येतो. ज्यावर खंडणी, एनकाऊंन्टरचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृती विषयी काय बोलावे, स्वत:ची प्रतिमा पुसून काढण्यासाठी कोणी जर आमच्या नेत्यांवर आरोप करत असेल तर हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांपुढे नेला जाईल, असे ते म्हणाले.
राज्य सरकारने दिवाळीपर्यंत कर्जमाफी देऊ, असा शब्द दिला होता. तसे न झाल्यास ५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे शेती क्षेत्रात काम करणाºया कार्यकर्त्यांना सोबत घेऊन असहकार आंदोलन पुकारू, असा इशाराही पवार यांनी दिला. ‘सरसकट’ कर्जमाफीशी तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, राष्ट्रवादी किसान मंचचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानातंर्गत राज्यभर दौरे केले आहेत. आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती केल्यामुळे शेतकºयांना २०० ते ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. कर्जमाफीचा पत्ता नाही पण फॉर्म भरण्यातच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
दीड लाखांवर कर्ज असलेल्यांना दिलेला वन टाईम सेटलमेंटचा पर्याय योग्य नाही. साडेचार लाखाचे कर्ज शेतकरी फेडू शकला तर तो थकबाकीदार झाला असता का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
‘त्या’ पक्षाविषयी काय बोलावे?
नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढला आहे, त्याबद्दल आपले मत काय, असे विचारल्यावर पवार म्हणाले, ज्यांचे चिरंजीव आणि समर्थक आमदार त्यांच्या नवीन पक्षात जायला तयार नाहीत त्या पक्षाविषयी मी काय बोलावे?