शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी देण्याची शरद पवार यांची मोदींकडे मागणी
By admin | Published: March 16, 2017 03:41 AM2017-03-16T03:41:23+5:302017-03-16T03:41:23+5:30
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून, डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
सुरेश भटेवरा , नवी दिल्ली
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट असून, डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे या वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याने बजावलेल्या नोटिसांची टांगती तलवार त्वरीत थोपवा,अबकारी विभागातर्फे इथेनॉलला एक्साइज करातून मिळणारी सूट सरकारने चालू वर्षापासून रद्द केली आहे, ती पुन्हा लागू करा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा निर्णय लवकरात लवकर जाहीर करा, या तीन मागण्याही शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केल्या. कारखान्यांना आकारण्यात येणाऱ्या प्राप्तिकराचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य तो मार्ग लवकरात लवकर काढू आणि अन्य दोन मागण्यांचाही सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर विचार करू असे आश्वासन पंतप्रधानांनी पवारांना दिले.
ऊ स उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवलेला उचित व योग्य दरापेक्षा (एफआरपी) अधिक भाव देणाऱ्या महाराष्ट्र व गुजरातच्या सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाने जवळपास ५ हजार कोटी रुपये कर भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत, याकडे पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. ऊ साला अधिक दर देण्याची कारखान्यांची क्षमता असेल तर त्यांनी प्राप्तिकर भरायलाच हवा, असा त्या विभागाचा आग्रह आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने हवालदिल झाले आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले हा त्यांचा गुन्हा नसून याबाबत सरकारचा निर्णय पूर्णत: चुकला आहे. कारखान्यांकडे सध्या इतकी रक्कम भरण्यासाठी पैसा नाही. या गोष्टींचा विचार करून नोटिसा त्वरित थोपवाव्यात, अशी आग्रही मागणी पवारांनी मोदींकडे केली.