'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:06 PM2024-11-18T22:06:20+5:302024-11-18T22:10:41+5:30

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.

Sharad Pawar's group condemns attack on Anil Deshmukh | 'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आपली प्रचारसभा आटोपून अनिल देशमुख परतत होते, यावेळी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली, ज्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख काटोल मतदार संघातील नरखेड येथील सभा आटपून तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. यावेळी काटोल-जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात देशमुख यांच्या डोक्याला गंभीर गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. 

पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, राज्य सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. 'राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे,' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांनीदेखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्याचे माजी गृहमंत्री व आमचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध..! राज्यात कायदा व सुव्यवस्था केवळ कागदावर राहिली आहे. ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य खरंच जंगलराजकडे वळला आहे, हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राने अशी विकृती कधीच पाहिली नव्हती. विशेषत: नागपुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप सपशेल झाली असून गुन्हेगारांना इथे बळ मिळाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी आमची मागणी आहे, असं आव्हाड म्हणाले.

Web Title: Sharad Pawar's group condemns attack on Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.