‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 04:09 PM2024-02-20T16:09:58+5:302024-02-20T16:10:51+5:30

Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका, असा टोला लगावला आहे. 

Sharad Pawar's group doubts, 'How long will this Maratha Reservation Act stand the test, are the Marathas really agreeable to it?' | ‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका 

‘हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल, मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का?’ शरद पवार गटाची शंका 

मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा ठराव आज विधिमंडळामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या नुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रत्येकी १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला सर्वपक्षीयांना सभागृहात पाठिंबा दिला होता. मात्र विशेष अधिवेशन संपल्यानंतर या आरक्षणावर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका, असा टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे. आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही. आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल,हे लक्षात असू द्या. मुंबईच्या मोर्च्यात 'सगेसोयऱ्यां'वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय.सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय? असा सवाल जितेंद्र आव्हाड उपस्थित केला आहे.  

आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? यात शंकाच आहे.  वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही,तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्याना वाहावे लागेल,हे लक्षात असू द्या,असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 

Read in English

Web Title: Sharad Pawar's group doubts, 'How long will this Maratha Reservation Act stand the test, are the Marathas really agreeable to it?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.