शरद पवारांची भाषा आदिवासी समाजात फूट पाडण्याची; व्हिडिओ पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 09:57 PM2021-11-18T21:57:02+5:302021-11-18T21:59:16+5:30
शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती, त्याला देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवारांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. 'दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये आदिवासी संमेलन झाले, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी शब्द न वापरता, वनवासी शब्द वापरला,' असा आरोप शरद पवारांनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी संमेलनाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. आपल्या भाषणात मोदींनी आदिवासी हा शब्द वापरल्याचे दिसत आहे.
श्री शरद पवार जी, @PawarSpeaks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2021
आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी @narendramodi यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत.
(1/2) https://t.co/VhLPbCyFc2pic.twitter.com/PQXfaTl1ia
हाच व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांनी लिहीले की, 'शरद पवारजी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार ?
शरद पवारांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीस संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही. आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे, असं पवार म्हणाले.