शरद पवारांनी शेवटच्या दिवशी बदलला उमेदवार! मोहोळमध्ये 'तुतारी'वर कोण लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:16 PM2024-10-29T12:16:50+5:302024-10-29T12:17:44+5:30
Raju Khare Mohol: मोहोळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती. पण, आता मोहोळमधील उमेदवार बदलण्यात आला आहे.
Mohol Assembly Election 2024 Candidates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण, त्यांचा एबी फॉर्म रद्द करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले. आता राजू खरे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. हा माजी आमदार रमेश कदम यांच्यासह सिद्धी कदम यांना मोठा धक्का मानला जात आहे.
सिद्धी कदमांच्या उमेदवारीला विरोध
मोहोळ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्येशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना एबी फॉर्मही दिला.
सिद्धी कदमांना स्थानिक नेत्यांचा विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. त्याचबरोबर पक्षाने उमेदवार बदलावा अशी मागणी केली होती. स्थानिक पातळीवरील विरोधाची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले.
सिद्धी कदम यांना अनावधानाने एबी फॉर्म दिला गेला होता. तो रद्द करण्यात यावा, असे जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला कळवले होते.
राजू खरेंच्या नावाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजू खरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
पाचव्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील, मुलुंडमधून संगिता वाजे, मोर्शीतून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत आणि मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली.