शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:41 PM2024-08-06T21:41:24+5:302024-08-06T21:43:00+5:30

शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून देण्यात आली आहे.

Sharad Pawars NCP will make an important announcement tomorrow Which big decision to make | शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्रात काही महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन गट आपआपसांत भिडणार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष रंगणार आहे. अशातच निवडणूक तयारीसाठी कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं असतानाच आता उद्या शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून देण्यात आली आहे.

"प्रसार माध्यमांनो...आम्ही सत्वाची, तत्वाची आणि रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार आहोत, अवघे अवघे या," असं आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलं आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन इथं उद्या सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत महत्त्वाची घोषणा केली जाणार असल्याचंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संबोधित करण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही प्लॅन तयार!  

"पक्षाचे कार्यकर्ते, महिला, शेतकरी आणि युवांसाठी असलेले आमचे प्रगतीचे ध्येय अधिक विस्तृत करण्यासाठी आणि  विशेषत: महाराष्ट्रातील जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी आम्ही जनसन्मान यात्रा आयोजित केली आहे," अशी घोषणा काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली." ही यात्रा ८ तारखेला नाशिक, १५ ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, २२ नंतर मुंबई आणि २६ ऑगस्टपासून विदर्भात असणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भूमिका समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची  आहे. नागरिकांच्या मनातील भीती आणि विरोधक पसरवत असलेल्या खोट्यानाट्या अफवा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रा महाराष्ट्रभर काढत आहे. यात्रेद्वारे राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि महायुती सरकारची लोककल्याणाची बांधिलकी जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची प्रत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेशी असलेल्या बांधिलकीचा दस्तऐवज आहे. अजितदादांनी समाजातील महिला, युवक, शेतकरी, आदिवासी, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेतृत्व सकारात्मकतेवर विश्वास ठेवते आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी पक्ष कार्यतत्पर आहे," असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

Web Title: Sharad Pawars NCP will make an important announcement tomorrow Which big decision to make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.