शरद पवारांचाच ‘पाॅवर प्ले’! राजीनाम्याच्या खेळीने राष्ट्रवादीत काय सिद्ध झालं?
By दीपक भातुसे | Published: May 6, 2023 10:25 AM2023-05-06T10:25:23+5:302023-05-06T10:34:09+5:30
राजीनाम्याच्या घटनेनंतर पक्षातील साध्या कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी आणि नेत्यांपर्यंत सगळेच जण शरद पवारांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र मागील चार दिवसांत पाहायला मिळाले
दीपक भातुसे
मुंबई - शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच हलकल्लोळ झाला. गेले चार दिवस शरद पवार हेच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. यातून शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
राजीनाम्याच्या घटनेनंतर पक्षातील साध्या कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी आणि नेत्यांपर्यंत सगळेच जण शरद पवारांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र मागील चार दिवसांत पाहायला मिळाले. यावरून पक्षात इतर कोणाचेही वर्चस्व नसल्याचे पवारांच्या राजीनाम्याच्या खेळीने स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षावर शरद पवारांचा एकछत्री अंमल आहे. पक्षाच्या २४ वर्षांच्या कार्यकाळात अनेकदा पक्षात गटातटाचे राजकारण पाहायला मिळाले, पण शरद पवार या एका नावाने राष्ट्रवादी पक्षाला बांधून ठेवले आहे.जेव्हा जेव्हा पक्ष संकटात आला त्या-त्या वेळी पवारांनी खंबीरपणे उभे राहून पक्षाला संकटातून बाहेर काढले आहे.
समविचारी पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका
देशातील सध्याचे जे चित्र आहे, त्या पार्श्वभूमीवर समविचारी लोकांना एकत्रित आणण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात माझे व्यक्तिशः अनेक राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या कामात लक्ष देण्यासाठी तुमची आवश्यकता असल्याचे अनेक सहकाऱ्यांनी सांगितल्याचे पवार यावेळी म्हणाले. राहुल गांधींसह काँग्रेसमधील नेते याबाबत बोलले. उद्धव ठाकरेंच्या वतीने राऊत व इतर सहकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
लिखाणाचा इन्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार होते. मात्र, पवारांनी राजीनामा दिल्याने त्याला खीळ बसल्याचे संजय राऊत यांनी लिहिले होते. त्याबाबत पवार म्हणाले की, ज्यांनी लिहिले त्यांना प्रश्न विचारा, आमच्याकडे अशी माहिती नाही. कुठेतरी लिखाण आले असेल; पण आमच्या संघटनेत तशी अवस्था नव्हती, असा खुलासाही त्यांनी केला.
..तर बारसूला जाणार
उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच काही अधिकाऱ्यांनी मला बारसूबाबत माहिती दिली, तसेच प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊनच सरकारने निर्णय घ्यावा. विकासाचे प्रकल्प हवे असतात; पण त्या भागातील लोकांना विश्वासात घेणे ही जबाबदारी प्रकल्प आणणाऱ्यांची असते. आवश्यकता असेल, तर त्याठिकाणी जाऊन स्थानिक शेतकऱ्यांशी पक्षातर्फे सुसंवाद साधला जाईल, असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
२०१९ सारखे वातावरण, पुन्हा तशीच लाट
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी पक्षातील अनेक जुन्या नेत्यांनी आणि आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष कमजोर झाल्याचे चित्र होते; मात्र शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजूून काढला,कार्यकर्त्यांत जोश निर्माण केला.शरद पवारांबद्दल त्यावेळी पक्षात विशेषत: तरुण कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली होती. तशीच लाट आता राजीनामा दिल्यानंतर पवारांबद्दल निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
पर्याय देण्यास मेहनत करणार
महाविकास आघाडीच्या कामावर माझ्या निर्णयाचा परिणाम होईल, असे वाटत नाही. आम्ही आता सगळे एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे त्याबद्दल चिंता करण्याची गरजच नाही. लोकांना पर्याय देण्याची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मेहनत करू, असे पवार म्हणाले.
प्रतिभाताई भावुक
शरद पवार गाडीतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला आले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही त्यांच्याबरोबर होत्या. तिथली गर्दी आणि कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून प्रतिभाताई भावुक झाल्या होत्या. पवार पत्रकार परिषदेसाठी निघून गेले. मात्र, प्रतिभाताई गाडीतच बसून होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळेही पत्रकार परिषदेच्या ठिकाणी होत्या. मात्र, पत्रकार परिषद सुरू होताच, त्या खाली आल्या व आईबरोबर गाडीत बसल्या.
माघारीसाठी दबाव का?
शरद पवार नसतील तर पक्षात आपले भवितव्य काय असा प्रश्न अनेक नेत्यांना पडला होता. तसेच पवार नसतील तर पक्ष त्या मजबुतीने वाटचाल करू शकणार नाही, अशी भीतीही काही नेत्यांना होती.
पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित शाहांना भेटल्याचा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्याबाबत पवार म्हणाले की, काही लोकांची काही पक्की मते असतात, ती पक्की मते असणाऱ्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आमच्याबद्दल मत व्यक्त करण्याची वेळ आली, तर त्यांचे मत आमच्या प्रतिकूल असते. आम्ही त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही, लोक ते किती गांभीर्याने घेतात, ते माहीत नाही.
देश, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे
महाराष्ट्रातील आणि देशातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार. त्यांची देशाला आणि महाराष्ट्राला गरज आहे. तशी विनंती आम्ही सगळ्यांनी त्याला केली होती. जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे मान्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
शरद पवारांनी जो निर्णय जाहीर केला, त्याबद्दल सर्वांना आनंद झाला आहे. - अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस