लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 05:18 PM2024-06-03T17:18:03+5:302024-06-03T17:18:38+5:30

रद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत असून आज भाजपच्या एका माजी आमदाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पवार यांची भेट घेतली आहे.

Sharad Pawars preparations for the Legislative Assembly have started Before Lok Sabha results Former BJP MLA met pawar | लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट

लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : देशभरात सध्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया १ जून रोजी पार पडल्यानंतर उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. राज्यातील ४८ जागांपैकी कोण किती जागा जिंकणार, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीचा राजकीय धुरळा खाली बसत नाही तोच आता राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरू झाली आहे. कारण राज्यात पुढील चार ते पाच महिन्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत असून आज भाजपच्या एका माजी आमदाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे आज शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांचा विजय झाला होता. ते सध्या महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्याने सुधाकर भालेराव यांना भाजपकडून संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भालेराव यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या भेटीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीचे पडसाद आगामी काळात उदगीरच्या राजकारणावर पडताना पाहायला मिळू शकतात. 

विधानसभेसाठी महायुतीत रस्सीखेच

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी "विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. अजित पवार गटाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत," असं विधान पक्षाच्या बैठकीत केलं होतं. त्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.
 

Web Title: Sharad Pawars preparations for the Legislative Assembly have started Before Lok Sabha results Former BJP MLA met pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.