शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा - उद्धव ठाकरे

By admin | Published: December 12, 2015 09:06 AM2015-12-12T09:06:35+5:302015-12-12T09:06:35+5:30

शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे, ते बुद्धीबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार या शब्दांमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून

Sharad Pawar's retirement language is unclear - Uddhav Thackeray | शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा - उद्धव ठाकरे

शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे, ते बुद्धीबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार या शब्दांमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पवारांच्या अमृतमहोत्सवी समारंभांच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. शरद पवारांकडून शिकण्यासारखे खूप आहे असं सांगताना ठाकरे यांनी पवारांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, पवार कोणत्याही पदावर नाहीत. तरीही देशाच्या राजधानीत शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतनाचा जंगी सोहळा दोन दिवस आधीच झाला. मराठी नेत्याचा इतका जंगी सोहळा देशाच्या राजधानीत कधीच झाला नसेल. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुलायम सिंग यादव, लालू यादव, पंजाबचे मुख्यमंत्री बादल, लालकृष्ण आडवाणी, फारुख अब्दुल्ला, नितीशकुमार, देशाचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्यास पवारांच्या अभीष्टचिंतनासाठी हजर होते. पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात जे पेरले ते या सोहळ्यात उगवलेले दिसले, अशा शब्दात पवारांचे कौतुकही करण्यात आले आहे. 
दिल्लीतील समारंभात पवारांवर झालेल्या स्तुतीसुमनांचा उल्लेख करताना सामनाच्या अग्रलेखात, एकमेकांवर कौतुकाची फुले उधळणारे हे लोक
मग एकमेकांविरुद्ध निवडणुका का लढवतात आणि एकमेकांविरुद्ध कारस्थाने का करतात?  असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
 
अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे:
 
-‘देशाला न लाभलेला उत्तम पंतप्रधान’ (द बेस्ट पीएम इंडिया नेव्हर हॅड) असे राहुल बजाज यांनी पवारांविषयी म्हटले. त्यात तथ्य असले तरी याबाबत पवारांचे फासे
चुकले की त्यांचे फासे त्यांच्यावरच उलटले? हा राजकीय संशोधनाचा विषय आहे. - - मोदी व सोनिया गांधी यांनी पवारांचे गुणगान केले. श्री. पवार यांच्यात उत्तुंग कर्तबगारी व गुण आहेतच, पण दीडेक वर्षांपूर्वी मोदी यांनी बारामतीत येऊन काका-पुतण्यापासून महाराष्ट्र मुक्त करण्याची हाक का दिली होती? व सोनिया गांधी यांनी तर १३ वर्षांपूर्वी पवारांना काँग्रेस पक्षातून फेकून दिले होते ते कशासाठी?
- त्यांनी १४ निवडणुका लढवल्या व ते अपराजित राहिले. शरद पवार यांच्या इतका प्रचंड क्षमतेचा नेता महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात झाला नाही. शासनावर मांड ठोकून राज्य कसे चालवावे याचे धडे नवख्यांनी शरदरावांकडूनच घ्यावेत.
- बारामतीसारखा मागास परिसर विकासाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर नेऊन ठेवला. जगभरातील नेत्यांचे पाय बारामतीस नेहमीच लागतात, पण संपूर्ण महाराष्ट्रास बारामतीचे भाग्य लाभले नाही हे सुद्धा तितकेच खरे.
- पवार आज राष्ट्रीय पातळीवरील बलदंड नेते आहेत व उद्योग, सामाजिक क्षेत्रातील पुढारी पवारांचा शब्द मानतात, पण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातोय हीदेखील वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे हे राज्य होते म्हणून शरद पवार जगाला माहीत झाले. त्यामुळे पवारांचा प्रचंड अनुभव राज्याच्या कामी यावा अशी भावना महाराष्ट्राने बाळगली तर काय चुकले?
- देशाचा सर्वोच्च नेता होण्याची क्षमता असूनही पवारांना ते भाग्य लाभले नाही, तरीही पवार राजकारणात ५० वर्षे तळपत राहिले. दिल्लीत त्यांच्या अमृत महोत्सवाचा सोहळा झाला. आज महाराष्ट्रात सर्वच लोक एकत्र येऊन ‘शरदोत्सव’ साजरा करीत आहेत.
- शरद पवार आता राजकीय निवृत्तीची भाषा करीत असतात, पण त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच
खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. निवृत्तीची भाषा हा चकवा आहे.

Web Title: Sharad Pawar's retirement language is unclear - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.