शरद पवारांनी केले आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन
By Admin | Published: August 7, 2016 08:40 PM2016-08-07T20:40:22+5:302016-08-07T20:40:22+5:30
मंत्री आणि आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांची घसघशीत वेतनवाढ झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 7- मंत्री आणि आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांची घसघशीत वेतनवाढ झाली आहे. या वेतनवाढीचे शरद पवारांनी रविवारी समर्थन केले. आमदारांना कराव्या लागणाऱ्या खर्चाची मांडणी करीत मला वृत्त वाहिन्यांच्या अँकर्स, संपादकांच्या पगारींचाही आकडा माहिती असल्याचे ते मश्किलपणे म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केलेल्या ‘गोरक्षक नव्हे समाजकंटक’ या वक्तव्यावर या गोरक्षकांना इतके दिवस कोणाचा आशीर्वाद होता, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली असल्याचे वक्तव्य करीत हे गोरक्षक नव्हे तर समाजकंटक असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता अलिकडील काळात गोरक्षक ही नवाच प्रकार पुढे आला आहे. मात्र, या गोरक्षकांना इतके दिवस कोणाचा आशीर्वाद होता? या विषयावर यापूर्वीच ते बोलले असते तर हा प्रकार इतका वाढला नसता. उशिरा का होईना मोदी बोलले आहेत. मात्र, गोरक्षक सुधारतील यावर आपला विश्वास नसल्याचे ते म्हणाले.
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. सरकारचे नियंत्रण आणि दरारा नसल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही, कारण मी मुख्यमंत्री असतानाही माझ्याकडेच गृहविभाग होता. आजवरच्या काळकिर्दीत एकटे जयंतराव पाटील हे स्वतंत्र गृहमंत्री होते. मात्र, वाढत्या गुन्हेगारीबाबत मी एवढेच म्हणेण की, गृह खात्याचा कारभार अधिक निगराणीने पाहणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. मध्यंतरी कोपर्डी येथील घटनेनंतर शरियत कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती. या अनुषंगाने शरद पवार यांना विचारले असता राज ठाकरे काय म्हणाले, ते मला माहित नाही. मात्र, अत्याचाराच्या प्रकरणात शासन, प्रशासनाने वेगाने कारवाई केल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असेही ते म्हणाले.
महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशिक्षण
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आ. विद्या चव्हाण यांच्या पुढाकाराने काही महिलांचा संच तयार करून मुलींचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी संघटनेमार्फत लवकरच करू, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली. देशातील गुन्ह्यांची संख्या पाहिली असता त्यात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्र असताच कामा नये. त्यासाठी आपणा सर्वांना महिलांचा सन्मान, समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. महिला अत्याचारासंदर्भातील कायदे सक्षम आहेत, कठोर आहेत. मात्र, शिक्षेचे प्रमाण वाढण्याची आवश्यकताही पवार यांनी व्यक्त केली.