घडाळ्याच्या काट्यावर धावणार का मनसेचं इंजिन ?

By वैभव देसाई | Published: June 2, 2019 03:34 PM2019-06-02T15:34:23+5:302019-06-02T15:37:34+5:30

गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Sharad Pawar's support will gain the MNS ? | घडाळ्याच्या काट्यावर धावणार का मनसेचं इंजिन ?

घडाळ्याच्या काट्यावर धावणार का मनसेचं इंजिन ?

googlenewsNext

- वैभव देसाई
गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपानं अपेक्षेपेक्षाही जास्त जागा मिळवल्यानं राजकीय पंडितांचीही गोची झाली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी घेतलेल्या सभाही जनतेसाठी कुतूहलाचा विषय ठरला. विशेष म्हणजे या निवडणुकीत कुठेही उमेदवार न दिलेला मनसेच जास्त चर्चेत राहिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोदी-शहांच्या विरोधात जे रान उठवलं होतं, त्यानं भाजपाच्या गोटातही खळबळ उडाली होती. राज ठाकरेंच्या सभा जितक्या गाजल्या, तितका प्रतिसाद कोणत्याही इतर पक्षांच्या सभेला मिळालेला नव्हता. 'लाव रे तो व्हिडीओ' हे राज ठाकरेंचे शब्द परावलीचे झाले. सभेमध्ये राज ठाकरे जेव्हा ते शब्द उच्चारत, तेव्हा भाजपाचेही धाबे दणाणले असल्याची अनेकदा प्रचिती आली. मनसेला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या तंबूतही काहीशी अस्वस्थता होती. पण निकाल लागला आणि राज ठाकरेंनी भाजपाविरोधात केलेला आटापिटा फोल ठरल्याचीच चर्चा जास्त रंगली.

राज ठाकरेंनी ज्या दहा ठिकाणी भव्य अशा सभा घेतल्या, त्यातील तीन मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राजच्या मोठमोठ्या सभा झाला. त्यापैकी सर्व जागी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार बळकट होते आणि राज ठाकरेंच्या सभांचा त्यांना फायदा झालाच, असं छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही. सभेला गर्दी झाल्यानं मते मिळतातच असे नाही, समोरच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होतेच असे नाही, असं किमान राजकीय जाणकारांचे मत आहे. सेना-भाजपाच्या विरोधात मतदान करणारा एक वर्ग आहे. पण त्या वर्गालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पर्याय वाटत नाहीत. मतदार आपल्या पद्धतीने पर्यायाची चाचपणी करीत असतो आणि त्यालाच राजनी आपल्या सभांमधून आकर्षित केले. राज ठाकरेंना मानणारा एक विशेष वर्ग आहे. राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातल्या सभांमधून कोणाला मतदान करा हे स्पष्ट केलेलं नसल्यानं तो पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच आहे काय, याबद्दलच मतदार साशंक होते. तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी असा होता. त्यामुळे साहजिकच काँग्रेसची बऱ्यापैकी मते वंचित बहुजन आघाडीकडे वळली. त्यामुळे आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं जवळपास निश्चित केलं आहे.


काही दिवसांपूर्वी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांची एक बैठकही झाली, त्याबैठकीत मनसेला सोबत घेण्याचा आग्रह जवळपास सर्वच पक्षांनी धरला. त्यानंतर राज ठाकरेंनी पवारांची भेट घेतली अन् माणिकराव ठाकरेही राज यांच्या भेटीला गेले, त्यामुळे मराठा+मराठी समीकरण अस्तित्वात येणार याची अटकळ बांधली जात आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी जाहीर केली तेव्हाही बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना भवनावर हल्ला झाला होता. त्यानंतर 1979मध्ये काँग्रेसने शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. त्याची परतफेड म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. 1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एक देखील जागा लढवली नव्हती. शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला समर्थन दिले होते. त्यामुळे राज ठाकरेंनी जर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलाच, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. 

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मराठा समाजातील बऱ्याचशे नेते आता भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मनसेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या विरोधाचा मुद्दाही बासणात गुंडाळल्याची आता चर्चा आहे. तसेच राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात घेतलेला नसल्यानं पवारांच्या पुरोगामी राजकारणाला धोका नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि शरद पवार यांची वाढती जवळीक मनसे आणि राष्ट्रवादीला फायदेशीर ठरण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही पक्षांचे प्रभाव असलेले भाग वेगवेगळे असल्यानं राष्ट्रवादी आणि मनसेनं आघाडी केल्यास याचा दोन्ही पक्षांना लाभ मिळू शकतो.

महाराष्ट्र आणि मुंबईतल्या शहरी भागात मनसेचा चांगला जोर आहे. तर राष्ट्रवादीची ग्रामीण भाग, शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी ताकद आहे. राज ठाकरेंकडे असलेला मराठीचा वर्ग आणि राष्ट्रवादीची ताकद असलेला मराठा या दोघांची मतं एकगठ्ठा करून पवार नवी समीकरणं जुळवून आणू पाहत आहेत. मनसेनंही आंध्र प्रदेशमधल्या जगनमोहन रेड्डींसारखेच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास त्याचा मनसेला किती फायदा होतो हे येणारा काळच ठरवणार आहे. तर दुसरीकडे खरंच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांची आघाडी झाली, तर येती विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपाला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Web Title: Sharad Pawar's support will gain the MNS ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.