“भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल”: शरद पोंक्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:56 PM2023-08-08T15:56:28+5:302023-08-08T15:57:59+5:30
Veer Savarkar and Sharad Ponkshe: काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
Veer Savarkar and Sharad Ponkshe: ज्येष्ठ मराठी अभिनेते स्पष्टपणे आपली मते मांडत असतात. सोशल मीडिया असो किंवा व्याख्यान असो, शरद पोंक्षे स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा मत व्यक्त केले आहे. भारत हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
५० वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खासकरून काँग्रेस सरकारच्या काळात बदनामी करण्यात आली. हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे, म्हणून सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत. काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांचा सतत अपमान होत राहिला, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली.
सतत सावरकर वाचत रहावे लागेल
एका व्याख्यानात बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व होते, असे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, केवळ दीड, दोन तासांत सावरकर कळणार नाहीत. त्यासाठी सतत सावरकर वाचत रहावे लागेल. केवळ व्याख्यान ऐकून उपयोग होणार नाही, तर सावरकरांच्या प्रखर विचारांचा घरोघरी प्रचार-प्रसार आवश्यक आहे, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले.