शरद राव... एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व!

By Admin | Published: September 1, 2016 10:02 PM2016-09-01T22:02:43+5:302016-09-01T22:02:43+5:30

शरद जगन्नाथ राव. राजकारणापासून समाजकारणापर्यंत एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

Sharad Rao ... a multi-faceted personality! | शरद राव... एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व!

शरद राव... एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व!

googlenewsNext

चेतन ननावरे/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - शरद जगन्नाथ राव. राजकारणापासून समाजकारणापर्यंत एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व. केवळ संप पुकारून सर्वसामान्य वेठीस धरण्यापेक्षा प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय सुचवणारा कामगार नेता म्हणून राव यांची ओळख होती. म्हणूनच की काय प्रशासन नेहमी त्यांच्या मागण्यांसमोर नांगी टाकत होते. न्यायालयातील लढाईतही राव यांना पराभूत करणे,
प्रशासनाला फार कमी वेळा जमले. त्यामुळे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राव यांची ओळख निर्माण झाली होती.
फर्नांडीस यांच्या तालमीत तयार झालेले राव यांनी परिसेविकेपासून डॉक्टरपर्यंत, महापालिकेच्या सफाई कामगारापासून अभियंत्यांपर्यंत प्रत्येक घटकाची संघटना उभारून ती वाढवली. फेरीवाला, विडी-तंबाखू कामगार-विक्रेते, अग्निशमन दलातील कर्मचारी अशा प्रत्येक संघटित, असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तितकेच आग्रही असायचे. त्यामुळेच
त्यांच्या एका हाकेवर उभी मुंबई बंद व्हायची. कामगारांच्या प्रश्नांसाठी सर्वसामान्यांच्या टीकेचे धनी होताना शासकीय अधिकाऱ्यांसोबत तू तू-मैं मैं व्हायची. याच कारणास्तव विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
९ फेब्रुवारी १९४० साली जन्माला आलेल्या राव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत कामगारांसाठी लढा दिला. अखेरच्या काळातही कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देताना ते कामगारांसाठी लढत होते. उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतच लढाई जिंकून त्यांनी फेरीवाल्यांना न्याय मिळवून दिला. राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ह्णचे २०१३-१४ मध्ये फेरीवाला
कायद्यात रुपांतर होण्यात राव यांची मोलाची भूमिका होती. नानावटी रूग्णालयात उपचार घेताना मोटार वाहन दुरूस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी रूग्णालयाच्या सभागृहातच पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामधून
राव यांची कामगारांप्रती असलेली तळमळता स्पष्ट होते.
कामगारांना अपग्रेड करण्यासाठी राव यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना हजेरी लावली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कामगार तयार करण्याचा त्यांचा आग्रह होता. कॅनडा येथील कामगार विषयावर भरलेल्या कॉमन वेल्थ कॉन्फरसला ते हजर होते. महापालिकेच्या सोविएत रशियाला गेलेल्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. इस्त्रायल सरकारने एक महिन्याच्या कालावधीच्या
स्टडी-कम-कॉन्फरसला उपस्थित राहण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. अमेरिका, रशिया, फ्रान्स, स्वित्सर्झलँड, हॉलण्ड अशा अनेक परिषदांमध्ये उपस्थित राहून तेथील ज्ञानाचा फायदा राव यांनी येथील कामगारांसाठी केला. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने एका बहुआयामी कामगार नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.
...................................................

शरद राव यांनी नेतृत्त्व केलेल्या संघटना -

संस्थापक व प्रमुख सल्लागार -
- मुंबई हॉकर्स युनियन
- मुंबई आॅटोरिक्षामेन्स युनियन
- मुंबई गुमास्ता युनियन
- मुंबई विडी-तंबाखू व्यापारी संघ

अध्यक्ष -
- महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन
- म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई
- म्युनिसिपल नर्सिंग अ‍ॅण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन, मुंबई
- म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई
- म्युनिसिपल लेबर युनियन, ठाणे
- नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन
- मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन
- डॉ. राममनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ संस्था

सरचिटणीस -
- मुंबई लेबर युनियन

Web Title: Sharad Rao ... a multi-faceted personality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.