शरद राव म्हणजे संघटन आणि संघर्ष
By admin | Published: September 21, 2016 02:33 AM2016-09-21T02:33:08+5:302016-09-21T02:33:08+5:30
शरद राव यांनी कामगार चळवळीत काम करताना संघटन आणि संघर्षाचा आदर्श घालून दिला आहे.
मुंबई : शरद राव यांनी कामगार चळवळीत काम करताना संघटन आणि संघर्षाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या पुढील पिढीनेही त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा अवलंब करीत कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी. या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत राहू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी म्हटले.
ज्येष्ठ कामगार नेते दिवंगत शरद राव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शरद पवारांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, शेकाप नेते जयंत पाटील, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, कामगार नेते विश्वास उटगी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित होता. या वेळी शरद पवार म्हणाले की, शरद राव यांच्या शोकसभेस उपस्थित राहावे लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. राव यांनी संपूर्ण आयुष्य संघर्षात घालविले. कामगार चळवळीत काम करताना संप कधी पुकारायचा आणि तो कधी आवरता घ्यायचा, याचे अचूक टायमिंग शरद रावांकडे होते, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
ज्या काळात कामगार नेते म्हणजे सोन्याची चैन, लॉकेट आणि पंचतारांकित राहणीमान बनले होती त्या काळातही शरद राव यांनी आपल्या साधेपणाने आदर्श घालून दिला होता. नोकरी आणि घर या मध्यमवर्गीय मानसिकतेला छेद देत शरद राव यांनी कामकार चळवळीत पूर्णवेळ काम केले, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)