शरदराव, तुम्ही कसले ‘राष्ट्रवादी’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 07:02 AM2019-04-13T07:02:18+5:302019-04-13T07:03:27+5:30
नरेंद्र मोदी यांचा सवाल; राधाकृष्ण विखेंचा भाजपप्रवेश मात्र झालाच नाही
अहमदनगर : ‘शरदराव, तुम्ही राष्ट्रवादाच्या नावाने काँग्रेस सोडली. मग आज जे लोक भारतापासून काश्मीरला वेगळे करू पाहत आहेत, अशांच्या बाजूने तुम्ही कसे? ‘राष्ट्रवादी’ म्हणून तुम्ही धूळफेक का करता? विदेशी चष्म्याने देशाकडे पाहता का?’ असे सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लक्ष्य केले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. जम्मू काश्मीर व भारतात दोन वेगवेगळे पंतप्रधान असावेत, अशी भाषा होत असताना पवार गप्प का? शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्हाला झोप कशी येते? असे ते म्हणाले. मध्य प्रदेशात कुपोषणमुक्तीसाठी गेलेला पैसा तेथील सरकारकडून दिल्लीत तुघलक रोडवर एका बंगल्यात जात आहे. हा काँग्रेसचा ‘चुनावी घोटाळा’ आहे. घोटाळे हीच काँग्रेसची संस्कृती आहे. मी मात्र चौकीदाराच्या भूमिकेत आहे, असेही मोदी म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे या सभेत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती, पण हा प्रवेश झाला नाही. विखे सभेला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांचे बंधू राजेंद्र विखे व्यासपीठावर होते.
‘सर्जिकल स्ट्राइक’साठी गांधींचे तिकीट कापले - फडणवीस
खासदार दिलीप गांधी यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या पाठिशी आपण राहणार आहोत, पण डॉ. सुजय विखे यांना पक्षात घेऊन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक करायचा होता, म्हणून गांधी यांचे तिकीट कापावे लागले, असे मुख्यमंत्री फडणवीस सभेत म्हणाले.
प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान यापुढे पाच एकरच्या पुढील शेतकऱ्यांनाही देऊ. साठ वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शन, विशेष जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती ही आश्वासने त्यांनी दिली. तुमचे प्रत्येक मत मोदींना मिळणार, असे सांगत ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषणा मोदी यांनी जनसमुदायाकडून उद्धृत करून घेतली.
मोदींच्या टीकेमुळे
माझी जाहिरातच - पवार
तासगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकºयांना ‘साले’ म्हणतात. प्रवक्ते आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना ‘लावारिस’ म्हणतात. भाजप सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. हे सरकार खाली आणायला हवे. नरेंद्र मोदी तर राज्यात सभांमध्ये माझ्यावर टीका करून, माझी बिनपैशाची जाहिरात होत आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत दिले.