मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज ‘शिवबंधन’ बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:42 AM2019-03-11T02:42:38+5:302019-03-11T07:00:03+5:30
मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे हे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
नारायणगाव : मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे हे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी २ वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांना शिवबंधन बांधणार आहेत. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच आपण शिवसेनेच्या स्वगृही परतत आहोत, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नारायणगाव येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सोनवणे यांनी ही माहिती दिली. यावेळी पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, संदीप लेंडे, पिंपळगावचे सरपंच निखिल गावडे, महेश शेळके, लहू वायकर, अभय वाव्हळ आदी उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, की शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन ग्रामीण भागात मनसे पक्ष लवकर वाढणार नाही, मला शिवसेनेकडून विचारणा केली जात असल्याचे सांगून त्यांच्याशी सर्व चर्चा केल्यानंतरच, आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली. याभेटी प्रसंगी आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे हेदेखील होते. मुख्यमंत्र्यांनी भाजपामध्ये येण्यास आपणास आमंत्रण दिले होते. मात्र, जुन्नर विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने ही जागा आपण शिवसेनेकडे मागू आणि त्यांना हवी ती जागा देऊ, असे मुख्यमंत्री बोलले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास आपणांस हिरवा कंदील दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाराजी दूर करणार
जुन्नर तालुक्यातील नाराज शिवसैनिकांची आपण वैयक्तिक भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार आहोत. आजही हजारो शिवसैनिक आपल्या प्रवेशाने आनंदी आहेत. जे पदाधिकारी शिवसेनेपासून दूर गेलेले आहेत, त्यांना पक्षात परत आणून त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपले नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत, असे सोनवणे म्हणाले.