शार्दूल, आदित्यचा शोधनिबंध ‘जेटीआरआय जर्नल’मध्ये
By admin | Published: June 4, 2016 03:31 AM2016-06-04T03:31:43+5:302016-06-04T03:31:43+5:30
विधि क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यायिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (जेटीआरआय जर्नल) वार्षिक अंकात प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे शार्दूल कुलकर्णी
मुंबई : विधि क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यायिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (जेटीआरआय जर्नल) वार्षिक अंकात प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे शार्दूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) आणि आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) या दोन तरुण विद्यार्थ्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. एवढ्या कमी वयात केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे विधि क्षेत्रात कौतुक होत आहे.
जेटीआरआय जर्नल या वार्षिकांकाचे काम सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि मेघालय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या वार्षिक अंकात हायकोर्टाच्या पाच नामांकित न्यायाधीशांचे लेख आहेत; तसेच इतरही अनेक प्रख्यात विधिज्ञांनी लिखाण केले आहे. अशा अंकात शार्दूल आणि आदित्य यांचा ‘व्हेक्सेशिअस लिटिगेशन इन इंडिया : लीगल पोझिशन अॅण्ड पॉसिबल रिफॉर्म्स’ हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यापूर्वीही ‘दी प्रॅक्टिकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने या दोघांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. (प्रतिनिधी)
मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा चर्चेत आल्यानंतर तेथील सरकारने विनाकारण त्रास देण्यासाठी न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या खटल्यांच्या निवारणासाठी कायदा केला. असा कायदा अन्य कोणत्या राज्यात आहे आणि तोच केंद्रीय पातळीवरही करणे शक्य आहे का? याचा शार्दूल आणि आदित्य यांनी अभ्यास केला. मध्य प्रदेशप्रमाणे आजमितीस महाराष्ट्र आणि तामिळनाडूतही असा कायदा आहे.
केंद्रीय पातळीवरही असा कायदा झाल्यास कुहेतूने एखाद्यावर खटला भरवणाऱ्यांना चाप बसणार असून, त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे; शिवाय असे कोर्ट कज्जे करणाऱ्यांवर ठपका ठेवण्याचा अधिकारही न्यायाधीशांना मिळणार आहे.